मुंबई: राज्यातील ठाकरे सरकारला दोन वर्ष पूर्ण झाले आहेत. या निमित्ताने राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ठाकरे सरकारचा लेखाजोखा मांडला आहे. यावेळी बाते कम, काम ज्यादा, हेच आमच्या सरकारचं धोरण आहे, असं नवाब मलिक यांनी सांगितलं.
नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारचा लेखाजोखा मांडतानाच भाजपवर निशाणा साधला. दोन वर्षापूर्वी आघाडीचं सरकार स्थापन झालं. आजच्या दिवशी मुख्यमंत्र्यांसह पाच मंत्र्यांनी शिवतीर्थावर शपथ घेतली. त्या दिवसापासून जनतेला न्याय देणं आणि महाराष्ट्राला पुढे नेण्याचा दृष्टीकोण आम्ही ठेवला आहे. नैसर्गिक आपत्ती आणि मानव निर्मिती आपत्ती निर्माण झाल्यावरही आमच्या सरकारने यशस्वीपणे परिस्थिती हाताळली आहे, असं मलिक यांनी सांगितलं.
आम्ही दोन वर्षात काहीच काम केलं नाही असं काही लोक म्हणत आहेत. पण या दोन वर्षात आम्ही काटकसरीचं धोरण स्वीकारलं. कोणत्याही कामाचा जास्त गाजावाजा करायचं नाही असं ठरवलं. जेव्हा काटकसरीचं धोरण स्वीकारतो तेव्हा कामगिरी कमी आणि गाजावाजा जास्त असं आम्ही करत नाही. उत्तर प्रदेशात छोटं काम होतं पण मुंबईतल्या वर्तमानपत्रात जाहिराती येतात. आमचं धोरण आहे, बाते कम, काम ज्यादा. इतरांचं धोरण काम करायचं नाही, केवळ प्रसिद्धी करायची. ते धोरण आमचं नाही, असं त्यांनी सांगितलं.
या दोन वर्षात महत्त्वाचे निर्णय झाले. मागच्या सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. पण तीन वर्ष त्यांना कर्जमाफी करता आली नाही. शेतकरी आंदोलन करत राहिले. त्यांना शेतकऱ्यांना न्याय देता आला नाही. आमचं सरकार आलं. पहिल्याच कॅबिनेटमध्ये कर्जमाफी केली. दोन लाखाचं कर्ज घेणाऱ्यांना दोन महिन्याच्या आत कर्ज माफ केलं. 20 हजार कोटीचं कर्ज माफ केलं. दोन लाखांवर ज्यांनी कर्ज घेतलं. त्यांना आश्वासन दिलं आहे. भविष्यात त्यांचा विचार करू. ज्यांनी नियमित कर्ज भरलं त्यांचाही विचार होणार आहे. कोविडमुळे आर्थिक ताण आला. पण आता त्यावरही निर्णय घेऊ, असं त्यांनी स्पष्ट केलं.
सरकारला तीन महिने होताच कोविड परिस्थिती निर्माण झाली. 66 लाखाहून अधिक नागरिक कोविड बाधित झाले होते. त्यांना औषधापासूनची सर्व व्यवस्था राज्य सरकारने केली. देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात होते, तरीही इतर राज्यांसारखी परिस्थिती आपल्या राज्यात झाली नाही. हॉस्पिटलमध्ये जागा मिळाली नाही अशी एकाही रुग्णाने तक्रार केली नाही. लोकांचा मृत्यू झाला. पण मृतदेहांची अवहेलना झाली नाही. इतर राज्यात अंतिम संस्कार करण्यासाठीही व्यवस्था झाली नव्हती. त्या राज्यांमध्ये स्मशानभूमीत जागा कमी पडल्याने मृतदेह नदीत टाकले. गंगेशेजारी दफन केले. तशी एकही परिस्थिती येथे झाली नाही, असं त्यांनी सांगितलं.
Fast News | महत्त्वाच्या घडामोडी | 9.30 AM | 28 November 2021 pic.twitter.com/2wnmwIuqlO
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 28, 2021
संबंधित बातम्या:
हा ट्रॅप आहे यात अडकू नका… प्रख्यात अभिनेत्री शुभांगी गोखलेंसोबत नेमकं काय घडलं?
ओमिक्रॉनची दहशत जास्त धोका कमी, नवा वेरिएंट आफ्रिकेत 2 महिन्यांपासून, नेमकं काय घडतंय?