मुंबई : एनसीबी मुंबई झोनलचे माजी डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांप्रकरणी आता त्यांची सीबीआय चौकशी होणार आहे. सीबीआयने दोन दिवसांपूर्वीच समीर वानखेडे यांच्या मुंबईतील घरी छापा टाकल्याची माहिती समोर आलेली. त्यानंतर सीबीआयने समीर वानखेडे यांना समन्स बजावल्याची माहिती समोर आली आहे. सीबीआयने समीर वानखेडे यांना उद्या सकाळी 11 वाजता चौकशीसाठी बोलावलं आहे. सीबीआयकडून समीर वानखेडे यांची मुंबईत चौकशी होणार आहे. विशेष म्हणजे सुरक्षेच्या कारणास्तव चौकशीच्या जागेबाबत स्पष्टता नाहीय.
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला समीर वानखेडे यांच्या टीमकडून ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेली. याच प्रकरणी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप आहेत. या प्रकरणी सीबीआयने समीर वानखेडे यांच्यासह आणखी चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केलाय. सीबीआयच्या दिल्ली युनिटने या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पण तरीही सीबीआय समीर वानखेडे यांची मुंबईत चौकशी करणार आहे. वानखेडेंच्या चौकशीसाठी सीबीआयचं दिल्लीतील पथक उद्या मुंबईत येणार आहे , अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
समीर वानखेडे यांच्या चौकशीबाबत एक सस्पेन्स आहे. हा सस्पेन्स म्हणजे सीबीआय समीर वानखेडे यांची चौकशी सीबीआय कार्यालयात करणार की इतर कोणत्या ठिकाणी करणार याबाबतची माहिती समोर आलेली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव याबाबतची माहिती समोर आलेली नाही.
एकीकडे सीबीआयकडून जलद गतीने सूत्रे हलवली जात असली तरी समीर वानखेडे यांच्याकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. आपण चौकशीला सामोरं जाणार किंवा चौकशीसाठी येणार, असा कोणताही निरोप समीर वानखेडे यांच्याकडून आला नसल्याची माहिती सीबीआयच्या सूत्रांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला दिली आहे.
समीर वानखेडेंच्या नेतृत्वात ऑक्टोबर 2021 एनसीबीनs मुंबईतल्या एका जहाजावर छापा टाकला होता. या छाप्यात ड्रग्ज घेतल्याप्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसहीत इतरांना अटक करण्यात आली होती. कोर्टात मात्र आर्यन खान आणि इतरांची निर्दोष मुक्तता झाली. एनसीबी आणि समीर वानखेडे आर्यन खानने ड्रग्स बाळगलं किंवा सेवन केल्याचा पुरावा देऊ शकले नव्हते.
कोर्टाने यावरुन समीर वानखेडेंच्या टीमवर ताशेरेही ओढले होते. यानंतर समीर वानखेडेंनी शाहरुख खानकडून 25 कोटींची खंडणी मागितली होती, असा आरोप या केसमध्ये पंच असलेल्या प्रभाकर साईल यांनीच केला. पुढच्या काही दिवसात पंच प्रभाकर साईल यांचा अचानक मृत्यू झाला. मृत्यूमागे हृदयविकाराचं कारण दिलं गेलं. नंतर समीर वानखेडेंच्या ड्रग्स छाप्यावरच्या कारवाईवरच प्रश्न उभे राहिले.
विशेष म्हणजे सीबीआयने आता जी एफआयर दाखल केलीय, त्यात समीर वानखेडेंनी सामूहिकरित्या कट रचून शाहरुख खानकडे 25 कोटींची खंडणी वसुलीचं षडयंत्र रचल्याचं म्हटलंय. शिवाय या 25 कोटीपैकी 50 लाख रुपये वानखेडे आणि इतर आरोपीना मिळाल्याचाही दावा सीबीआयने केलाय.