मुंबई : “नवी दिल्लीत जे घडतंय त्याला समर्थन नाही. पण ते का घडतंय? याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. शांततेने आंदोलन करणारा शेतकरी संतप्त का होतो याची जबाबदारी घ्यायला हवी होती. केंद्र सरकारने अजूनही शहाणपणा दाखवावा. कोणतीही टोकाची भूमिका घेऊ नये,” असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला. (Sharad Pawar on Delhi Farmers Tractor Rally Protest)
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं. या रॅली दरम्यान पोलीस आणि शेतकरी आमने सामने आले आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या असून त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना शरद पवारांनी ही प्रतिक्रिया दिली.
“कृषी विधेयक कायद्यासंबंधी 2013 पासून चर्चा सुरू होती. माझ्याकडे जबाबदारी असतानाही कायदा झाला होता. सर्व राज्यांचे कृषी मंत्र्यांना विश्वासात घेऊन पणन कायद्यांवर चर्चा करण्याचं ठरलं होतं. पण नंतर निवडणुका आल्याने तो विषय मागे राहिला. मोदी सरकारने तीन कायदे संसदेसमोर आणले. या कायद्यावर सविस्तर चर्चा व्हावी, चर्चेला मर्यादा असेल तर सिलेक्ट कमिटीकडे पाठवून सविस्तर चर्चा करून निर्णय घ्यावा ही आमची मागणी होती,” असे शरद पवार म्हणाले.
“सिलेक्ट कमिटीत सत्ताधाऱ्यांचं वर्चस्व असतं. पण या कमिटीत लोक पक्ष म्हणून विचार करत नाहीत, तर तज्ज्ञ म्हणून निर्णय घेतात. सिलेक्ट कमिटीत चर्चा झाल्यानंतर हे विधेयक संसदेत आलं असतं तर विरोध झाला नसता. पण संसदेत गोंधळात विधेयक मंजूर केलं. तेव्हाच काही तरी गडबड होईल असं वाटत होतं, ते आज झालं,” असेही शरद पवारांनी म्हटले.
“गेल्या 60 दिवसांपासून पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्यांनी भूमिका घेऊन आंदोलन केलं. कडाक्याच्या थंडीतही हे शेतकरी बसून आपलं म्हणणं मांडतात, संयम दाखवतात ही अभूतपूर्व गोष्ट आहे. इतक्या संयमाने भूमिका घेणारे शेतकरी असताना केंद्राने सकारात्मक पुढाकार घेऊन मार्ग काढायला हवा होता. संयमाने आंदोलन सुरू असताना वेगळ्या मार्गाने म्हणणं मांडण्यासाठी त्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढला. इतक्या दिवसानंतर संयमाने आंदोलन करणारे लोक रस्त्यावर उतरतात तेव्हा त्याकडे केंद्राने समंजसपणे पाहायला हवं होतं,” असेही पवार म्हणाले. (Sharad Pawar on Delhi Farmers Tractor Rally Protest)
“पंजाब-हरियाणा देशाचा अन्नदाता आहे. न दुखावता मार्ग काढायला हवा होता. ज्या पद्धतीने येण्या जाण्यासाठी काही परवानग्या द्यायला हव्या होत्या. पण जाचक अटी लादल्या गेल्या. त्यामुळे प्रतिकार झाला. संयम आणि 60 दिवसांचं आंदोलन पाहून ही परिस्थिती हाताळायला हवी होती. पण ते न केल्याने वातावरण चिघळलं. जे घडतंय त्याचं समर्थन नाही, पण ते का घडतंय याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शांततेने आंदोलन करणारा शेतकरी संतप्त का होतो याची जबाबदारी घ्यायला हवी होती,” असेही शरद पवारांनी सांगितले.
“केंद्राने अजूनही शहाणपणा दाखवावा. टोकाची भूमिका घेऊ नये. रास्त प्रश्नासंबंधित ज्या मागण्या असतील त्याला अनुकूल निर्णय घ्यावा. बळाचा वापर करून काही निर्णय घेतला. एकेकाळी अस्वस्थ पंजाब पाहिला आहे. तो सावरला आहे. त्या पंजाबला अस्वस्थतेकडे नेण्याचा पातक मोदी सरकारने करू नये हे आवाहन आहे,” असेही पवार म्हणाले.
“मुंबईत मोठ्या प्रमाणावर शेतकरी आले होते. पण त्यात राज्य सरकारनेही संयमाची भूमिका काल मुंबईत घेतली, सामंजस्य घेतलं. इथेही काही हजार लोक आले होते. शांतपणे आले आणि शांतपणे गेले. मुंबईत परिस्थिती हाताळून यशस्वी केली, तोच संयम केंद्राने दाखवायला हवा होता. बळाचा वापर करून आम्ही विषय मार्गी लावू शकतो असं वाटत असेल तर योग्य नाही,” असेही शरद पवारांनी सांगितले.
“नॉन पॉलिटिकल एलिमेंट्स आलं तर इतका उद्रेक करू शकतात का? 25 हजार ट्रॅक्टर एकत्र आले तर त्याचे परिणाम कसे होतील याचा विचार करा. वेळीच चर्चा करून रूट ठरवले असते तर हे घडलं नसतं. माहीत असूनही काही केलं नाही. गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीची दखलच घेतली नाही तर त्याचे काय परिणाम होतात ते दिसून आलं आहे,” असेही शरद पवार म्हणाले. (Sharad Pawar on Delhi Farmers Tractor Rally Protest)
संबंधित बातम्या :
दिल्लीत हिंसा भडकली हे गुप्तचर यंत्रणेचं अपयश; संजय राऊतांचं थेट अमित शहांकडे बोट