मुंबई : शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून नवं चिन्ह देण्यात आलं आहे. सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला लवकरात लवकर चिन्ह देण्याचे आदेश दिले होते. शरद पवार गटाकडून कपबशी, वटवृक्ष आणि तुतारी असे तीन पर्याय देण्यात आले होते. यामधील शरद पवार गटाला ‘तुतारी’ हे नवीन चिन्ह बहाल करण्यात आलं आहे. शरद पवार गटाकडून याबाबत सोशल मीडियावर माहिती देण्यात आली आहे. आता आगामी निवडणूकीत शरद पवार यांच्या पक्षाचं नाव हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर तुतारी हे नवीन चिन्ह असणार आहे. आगामी निवडणूकांमध्ये नव्या पक्षाला उभारी देण्यात ‘तुतारी’ कितपत यशस्वी ठरते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
“महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ्या बसवल्या होत्या, तीच ‘तुतारी’ आज निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणं ही ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’साठी गौरवास्पद बाब आहे. महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी, आदरणीय खा. शरदचंद्र पवार साहेबांच्या साथीने दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडण्यासाठी हीच ‘तुतारी’ पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याकरिता सज्ज आहे.”
“एक तुतारी द्या मज आणुनि
फुंकिन मी जी स्वप्राणाने
भेदुनि टाकिन सगळी गगने
दीर्घ जिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी द्या मजलागुनी!”“महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ्या बसवल्या होत्या, तीच ‘तुतारी’ आज निवडणूक चिन्ह… pic.twitter.com/LsgvjlWzuN
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) February 22, 2024
दरम्यान, शरद पवार यांच्या आधीच्या पक्षाचं चिन्ह घड्याळ हे देशासह खेडापाड्यात पोहोचलेलं होतं. आता शरद पवार यांच्या सर्व नेत्यांकडे नवीन पक्ष आणि चिन्ह प्रत्येत मतदारापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी असणार आहे.