‘वकिलाला मी भेटलो असेल तर…’; पुणे अपघात प्रकरणावर शरद पवार नेमकं काय म्हणाले?

| Updated on: May 24, 2024 | 5:11 PM

पुणे अपघात प्रकरणामध्ये शरद पवारांचे आणि आरोपीच्या वकीलांचे संबंध असल्याच्या चर्चा सुरू होत्या. याबाबत आज मुंबईमधील पत्रकार परिषदेत शरद पवार यांना याबाबत विचारण्यात आल्यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

वकिलाला मी भेटलो असेल तर...; पुणे अपघात प्रकरणावर शरद पवार नेमकं काय म्हणाले?
Follow us on

पुणे अपघात प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरू असून हे प्रकरण आता न्यायप्रविष्ठ आहे. अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल, आजोबा सुरेंद्र अग्रवाल, ड्रायव्हर आणि बार मालकांचीही चौकशी सुरू आहे. बाल हक्क न्यायालयाने अपघात प्रकरणामधील अल्पवयीन मुलाला 14 दिवस बालसुधार गृहात पाठवलं आहे.  या प्रकरणामध्ये विरोधी पक्षातील नेत्यांनी पुणे पोलिसांवर हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला. सध्या हे प्रकरण न्यायालयात असून कोणा-कोणावर कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांना पत्रकार सभेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावरून ते पत्रकारांवर संतापले.

शरद पवार का संतापले?

मुंबईमधील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी पवारांनी पुणे अपघात प्रकरणावरून प्रश्न विचारले, त्यावेळी एका प्रश्नावर उत्तर देताना ते संतापले. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यावर काही बोलत नाहीत?  हे तुम्ही त्यांनाच जाऊन विचारा असं उत्तर पवारांनी दिलं. या प्रश्नाला जोडून एका पत्रकराने, या प्रकरणातील आरोपीच्या वकिलासोबत तुमचे संबंध असल्याच्या चर्चा आहेत असं म्हटलं. यावर बोलताना, एखाद्या वकिलाला मी भेटलो असेल तर त्याचा संबंध याच्याशी लावता तुम्ही, प्रत्येक गोष्टीवर भाष्य करणं गरजेचं नाही. या प्रकरणात गृहमंत्र्यांनी जबाबदारी पार पाडली हे दिसल्यावर याला वेगळे स्वरूप देण्याची आवश्यकता नाही असं शरद पवार म्हणाले.

दरम्यान. या पत्रकार परिषदेमध्ये राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. ४० तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. राज्यात सध्या 73 टक्के दुष्काळ आहे. पुण्यात 16 टक्के, नाशिकमध्ये 22, कोकणात 29 टक्के असल्याचं सांगत आपल्याला धरणातील पाणीसाठा वाढण्यासाठी जुलैची वाट पाहावी लागणार असल्याचं शरद पवारांनी सांगितलं.

संभाजीनगरमध्ये 1561  गावात दुष्काळ आहे. तिथे 1038 पाण्याचे टँकर चालत आहेत. पुणे विभागात सध्या 635 गावात टँकरने पाणीपुरवठा केलं जात आहे. 10,572 गावात सध्या टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्या वर्षी 1108 गावात टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. आता जूनपर्यंत उरेल इतकाच पाणीसाठा राहिल्याचं पवार म्हणाले.