मुंबई : 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राचे राजकारण अस्थिर झाल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप-शिवसेना युतीत झालेल्या मतभेदानंतर, पहाटेची शपथविधी आणि त्यानंतरचा महाविकास आघाडीचा प्रयोग, महाविकास आघाडीच्या 3 पक्षांचे सरकार स्थापन होवून महाराष्ट्रातील जनतेला स्थिर सरकार पाहायला मिळत असताना शिंदेनी केलेले बंड. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंपच भूकंप होत आहे. अजित पवारांनी केलेले हे बंडही या भूकंपाचा हिस्सा असल्याने आणि शिवसेनेची झालेली वाताहत पाहता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार अॅक्शन मोड मध्ये आले आहेत. पक्षात फाटाफूट होवू नये, म्हणून बंड करणाऱ्या आणि बंडात सामील झालेल्या नेत्यांवर आता राष्ट्रवादीने कारवाई करण्याचे ठरवले आहे.
पक्षाला धोका दिलेल्या आमदारांसह त्यांच्या शपथविधीला उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांवरही कारवाई होणार आहे. राज्याच्या विद्यमान सरकारमध्ये सामील होणाऱ्या उपमुख्यमंत्री आणि मंत्री पदाची शपथ घेतलेल्या पक्षाच्या आमदारांसह शपथविधीसाठी उपस्थित राहणाऱ्या कार्यकर्त्यांवर पक्षातील नेत्यांवर पक्षाविरुध्द कारवाई केल्यामुळे पक्षातून बडतर्फ करण्याची कारवाई सुरु केली आहे.
शरद पवार सकाळीच साताऱ्यात दाखल झाले. पवारांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले. कोणत्याही नवीन कामाची किंवा संघर्षाची सुरुवात करायची असल्याच शरद पवार साताऱ्याची किंवा कोल्हापूराची निवड करतात. शरद पवार संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. थेट महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधून पक्ष संघटन मजबूत करणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सावध भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. बंड केलेल्या कोणत्याही नेत्यावर थेट आरोप केले जात नाही आहे. मात्र आता राष्ट्रवादीने बंडात सामील असलेल्या नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर कारवाई सुरु केली आहे. कालच्या शपथविधीला उपस्थित राहिलेल्या नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर पक्षाने कारवाई केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबई विभागीय कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, अकोला शहर जिल्हाध्यक्ष विजय देशमुख आणि पक्षाचे प्रदेश सरजिटणीस शिवाजीराव गर्जे यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांवर अशी कारवाई होणार असल्याची सुत्रांनी माहिती दिली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंवर पक्षातील नेत्यावर कारवाई केल्याची माहिती देण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या नेत्यांना पक्षातून बडतर्फ केले आहे. या नेत्यांनी कालच्या शपथविधीला हजर राहून पक्ष शिस्त तसेच पक्षाच्या ध्येयधोरणा विरुध्द कृती केली आहे. यामुळे या नेत्यांना तातडीने बडतर्फ करण्यात येत असल्याचे पत्राद्वारे कळवण्यात आले आहे.