मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारण कोणत्याही क्षणी खळबळ उडवू शकणाऱ्या काका- पुतण्याची जोडी म्हणजेच शरद पवार आणि अजित पवार यांच्यात सर्वकाही आलबेल नसल्याचं, विरोधी पक्षातील नेत्यांकडून उघडपणे सांगितलं जातं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षाअंतर्गत बदलांचे वारे वाहत आहे. कार्याअध्यक्ष पदापासून, नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ता सुरु आहेत. अशातच राष्ट्रवादीचे फायरब्रँड नेते अजित पवार हे पक्षापासून अलिप्त झाल्याच्या चर्चांणा उधाण आलं आहे.
दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत अनेक नेते उपस्थित होते. या बैठकीनिमित्त दिल्लीत पोस्टर लावण्यात आले आहे. मात्र, या पोस्टरवर माजी उपमुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचा फोटो पोस्टर नसल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांणा उधाण आलं आहे. राष्ट्रवादीकडून लावण्यात आलेल्या पोस्टरवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांचे फोटो आहेत. मात्र अजित पवारांचा फोटो नसल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पद सोडून, संघटनेत जबाबदारी द्यावी अशी मागणी केली होती. यावर शरद पवार यांनी हा निर्णय कार्यकारिणीवर सोपवला असून, पार्टीचे नेते यावर निर्णय घेतील, असे म्हटले आहे. अजित पवार यांच्याकडे महाराष्ट्रात काम करण्याचा दांडगा अनुभव असून, देखील सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्रातील जबाबदारी सोपवली आहे. अशातच, आता महाराष्ट्रात देखील पक्षाअंतर्गत बदल होणार असल्याची माहिती सुत्रांकडून समजत आहे.
दरम्यान, पुढच्या दोन महिन्यात प्रदेशाध्यक्ष निवडीची प्रक्रिया दोन महिन्यात होणार असल्याची चर्चा आहे. मागच्या 5 वर्षापासून जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत. या पदासाठी बदल अपेक्षित असल्याची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये झाल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे. दादांनी भर कार्यक्रमात बोलून दाखवलेली इच्छा आणि आता बदलाचे वारे एकंदरित अजित दादांकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी जाणार असल्याच्या दिशेने वाहू लागल्याची दबक्या आवाजामध्ये चर्चा आहे.