मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेना शिंदे गटात धुसफूस सुरु झाल्याची बातमी समोर आली होती. अजित पवार यांच्या शपथविधीमुळे त्यांच्या गटाकडे सर्व महत्त्वाची खाती जातील, अशी चर्चा शिंदे गटात होती. तसेच अजित पवार यांना अर्थ खातं दिली जाणार असल्याची चर्चा आहे. पण अर्थ खात्याला शिंदे गटाकडून विरोध होत असल्याची देखील बातमी समोर आली होती. या सगळ्या घडामोडींनंतर आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवार मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावे, यासाठी पडद्यामागे मोठ्या हालचाली घडत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या लंच डिप्लमसीनंतर आता बैठक सुरू आहे. या बैठकीत मराठा चेहरा म्हणून 2024 च्या निवडणुकांमध्ये अजित पवार यांच्याच नेतृत्वात निवडणूक व्हावी असा नेत्यांचा सूर आहे. अजित पवारांना मुख्यमंत्रीपदी कसं बसवायचं? यावर चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांनीदेखील आज आपल्या भाषणात आपल्याला राज्याचं मुख्यमंत्री होण्याची इच्छा असल्याचं म्हटलं आहे. आपण पाचवेळा राज्याचा उपमुख्यमंत्री बनलो. पण त्यापुढे गाडी जात नाहीय, अशी खंत त्यांनी आज व्यक्त केली. त्यानंतर आता पडद्यामागे घडामोडी घडत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने शिंदे गट बाद झाला नाही, तर कोर्टातून यावर काही तोडगा निघेल का? तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गट कोर्टात जाईल का? यावर चर्चा सूरु असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिंदे गटाचा करेक्ट कार्यक्रम होणार असल्याची चर्चा आहे. अजित पवार हे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वाद आता केंद्रीय निवडणूक आयोगात देखील पोहोचला आहे. अजित पवार यांनी मंत्रीपदाची शपथ घेण्याच्या दोन दिवस आधीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केला होता. अजित पवार यांनी 40 समर्थक आमदार आणि खासदारांची स्वाक्षरी घेऊन निवडणूक आयोगात याचिका दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे नेते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीदेखील निवडणूक आयोगात याचिका दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.