Baba Siddique Murder Case : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली. झिशान सिद्दीकी यांच्या वांद्र्यातील कार्यालयासमोर बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. बाबा सिद्दीकी यांच्यावर दोन बंदुकीतून एकूण सहा राऊंड फायर करण्यात आले. त्यापैकी तीन गोळ्या बाबा सिद्दिकी यांच्या छातीत लागल्या. बाबा सिद्दीकी यांची कार बुलेटप्रुफ असूनही गोळी काचेत घुसली होती. या घटनेनंतर राजकारणात खळबळ उडाली. आता याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने आणखी एका आरोपीला अटक केली आहे. प्रवीण लोणकर असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील संशयित सूत्रधार शुभम लोणकरचा भाऊ प्रवीण लोणकर याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुण्यातून अटक केली आहे. शुभम लोणकर आणि प्रवीण लोणकर यांनी धर्मराज कश्यप आणि शिवानंद या दोन आरोपींना बाबा सिद्दीकींची हत्या करण्यासाठी निवडल्याचा संशय पोलिसांना आहे. तसेच बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने स्विकारली आहे. शुब्बू लोणकर (शुभम लोणकर) नावाच्या व्यक्तीच्या अकाऊंटवरुन ही पोस्ट करण्यात आली होती.
यानंतर बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणी शुभम लोणकरचा मुंबई गुन्हे शाखेकडून शोध सुरु आहे. मात्र संशयित सूत्रधार शुभम लोणकर याचा भाऊ प्रवीण लोणकरला मुंबई पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. सध्या शुभम लोणकर हा फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात धर्मराज कश्यप आणि शिवानंद हे ज्या भंगाराच्या दुकानात काम करत होते, त्याच भंगाराच्या दुकानाच्या बाजूला प्रवीण लोणकरचे दुकान आहे. या हत्येसाठी प्रवीण लोणकर आणि त्याचा भाऊ शुभम लोणकर यांनी मिळून शिवानंद आणि धर्मराज कश्यप यांची निवड केली होती, असे म्हटलं जात आहे.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर बिश्नोई गँगमधील एका सदस्याने फेसबुकवर पोस्ट शेअर करत या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. जो कोणी सलमान खान आणि दाऊदच्या गँगची मदत करेल, त्याचा आम्ही हिशोब नक्की करु. बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूचे कारण म्हणजे त्यांचे बॉलीवूड, राजकारण आणि मालमत्ता व्यवहारातील दाऊद आणि अनुज थापन यांच्याशी असलेले संबंध, असे बिश्नोई गँगने म्हटले आहे. शुब्बू लोणकरने ही पोस्ट शेअर केली होती. त्यामुळे सध्या पोलीस त्याचाही शोध घेत आहेत.