दोन महिन्यांपूर्वी आले, कुर्ल्यात राहिले, एक दिवस आधीच बंदूक मिळाली आणि… बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवी अपडेट समोर

| Updated on: Oct 13, 2024 | 4:15 PM

गेल्या १५ ते २० दिवसांपासून ते बाबा सिद्दिकी यांच्या सर्व हालचालींवर लक्ष ठेवून होते. त्यांनी बाबा सिद्दीकी यांच्या घराची आणि ऑफिसची रेकी देखील केली होती.

दोन महिन्यांपूर्वी आले, कुर्ल्यात राहिले, एक दिवस आधीच बंदूक मिळाली आणि... बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवी अपडेट समोर
Follow us on

Baba Siddique Shot Dead : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. झिशान सिद्दिकी यांच्या वांद्र्यातील कार्यालयासमोर बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. याप्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने स्वीकारली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी विविध अपडेट समोर येत आहेत. त्यातच आता याप्रकरणी आरोपींचे मुंबई आणि पुणे कनेक्शन समोर आले आहे.

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी सध्या मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून तपास सुरु आहे. या तपासात विविध गोष्टींचा उलगडा होत आहेत. त्यातच आता बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ला करणारे आरोपी दोन महिन्यांपूर्वीच मुंबईत आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे यातील एक आरोपी हा पुण्यात कामावर होता. या प्रकरणात एकूण चार आरोपींचा सहभाग होता.

बाबा सिद्दीकींच्या घराची आणि ऑफिसची रेकी

बाबा सिद्दीकी यांची हत्या करणारे आरोपी २ सप्टेंबरला मुंबईत आले होते. त्यावेळी ते कुर्ला परिसरात भाड्याने खोली घेऊन राहत होते. या खोलीसाठी ते दर महिन्याला १४ हजार रुपये भाडे देत होते. तसेच या प्रकरणात सहभागी असलेल्या चार आरोपींनी या कामासाठी प्रत्येकी 50 हजार घेतले होते. या चौघांनी बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची सुपारी घेतली होती. गेल्या १५ ते २० दिवसांपासून ते बाबा सिद्दिकी यांच्या सर्व हालचालींवर लक्ष ठेवून होते. त्यांनी बाबा सिद्दीकी यांच्या घराची आणि ऑफिसची रेकी देखील केली होती.

हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधून आलेल्या तीन शूटर्सने बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार केला. त्यांना एका डिलीव्हरी बॉयच्या मदतीने बंदुक पुरवण्यात आली होती. हे तिघेही दुसऱ्या दिवशी रिक्षाने घटनास्थळी पोहोचले. त्यानतंर त्यांनी नीट प्लॅनिंग करत बाबा सिद्दीकी यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या.

दोन बंदुकीतून सहा राऊंड फायर

बाबा सिद्दीकी यांच्यावर दोन बंदुकीतून एकूण सहा राऊंड फायर करण्यात आले. त्यापैकी तीन गोळ्या बाबा सिद्दिकी यांच्या छातीत लागल्या. तर बाबा सिद्दीकी यांच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीच्या पायाला लागली. तर दोन गोळ्या बाबा सिद्दिकी यांच्या कारवर लागल्या. बाबा सिद्दिकी यांची कार बुलेटप्रुफ असूनही गोळी काचेत घुसली होती.

बाबा सिद्दीकी यांची हत्या करणारे तिघे पंजाबमध्ये एका जेलमध्ये असताना एकमेकांच्या संपर्कात आले होते. या फरार आरोपीच्या शोधासाठी गुन्हे शाखेची तीन पथकं उज्जेन (मध्यप्रदेश), हरियाणा आणि दिल्ली येथे रवाना झाली आहे. अभिनेता सलमान खानच्या घरावर ज्यावेळी हल्ला झाला. त्यावेळी देखील आरोपीचे नियोजन अशाच प्रकारे करण्यात आले होते.