बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे बिश्नोई गँगचे कनेक्शन, आरोपींची नावे समोर, मास्टरमाईंड कोण?

| Updated on: Oct 13, 2024 | 9:09 AM

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे सलमान खान गोळीबार कनेक्शन असून बिश्नोई गँगचा यात हात असल्याचे बोललं जात आहे. याप्रकरणी पोलिसांकडून सध्या तपास सुरु आहे.

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे बिश्नोई गँगचे कनेक्शन, आरोपींची नावे समोर, मास्टरमाईंड कोण?
Follow us on

Baba Siddique Shot Dead Accused Arrested : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेते बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आता याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर येत आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे सलमान खान गोळीबार कनेक्शन असून बिश्नोई गँगचा यात हात असल्याचे बोललं जात आहे. याप्रकरणी पोलिसांकडून सध्या तपास सुरु आहे. आता बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या तीन आरोपींची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी यांच्यावर तीन जणांनी गोळीबार केला. याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले होते. तर तिसरा आरोपी अद्याप फरार आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर या तिघांनी दोन बंदुकीतून सहा गोळ्या झाडल्याचे बोललं जात आहे. या प्रकरणातील एक आरोपी हा हरियाणातील आहे, तर दुसरा आरोपी हा उत्तर प्रदेशातील असल्याची माहिती समोर येत आहे. या तिघांपैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

बाबा सिद्दीकी यांची हत्या करणाऱ्या तीन जणांपैकी दोघांची ओळख पोलिसांना पटली आहे. यातील एका आरोपीचे नाव करनैल सिंह असे असून तो हरियाणातील आहे. तर दुसरा आरोपी हा उत्तर प्रदेशातील असून धर्मराज कश्यप असे त्याचे नाव आहे. हे तिन्ही हल्लेखोर रिक्षाने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी या तिघांनाही चौथा व्यक्ती मार्गदर्शन करत होता, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा चौथा आरोपी मास्टरमाईंड असल्याचे बोललं जात आहे.

हत्येचा कट रचण्यासाठी घरासह कार्यालयाचीही रेकी

बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून कट रचण्यात येत होता. त्यांच्या घराची आणि कार्यालयाची रेकीही करण्यात आली होती. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यासाठी आरोपी हे रिक्षाने घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर त्यांनी एका बाईकवरुन येत बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडल्या. त्यांच्यावर दोन बंदुकीतून एकूण सहा राऊंड फायर करण्यात आले. त्यापैकी तीन गोळ्या बाबा सिद्दिकी यांच्या छातीत लागल्या. तर एक गोळी बाबा सिद्दिकी यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीच्या पायात लागली. तर दोन गोळ्या बाबा सिद्दिकी यांच्या कारवर लागल्या. बाबा सिद्दिकी यांची कार बुलेटप्रुफ असूनही गोळी काचेत घुसली होती. त्यामुळे हल्लेखोरांकडे अत्याधुनिक बनावटीचे पिस्तूल असावे, असा अंदाज आहे.

आरोपी लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित

बाबा सिद्दीकी यांची हत्या करणारे आरोपी हे कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित असल्याची धक्कादायक माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. सध्या पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे. काही दिवसांपूर्वी लॉरेन्स बिश्नोई गँगच्या सदस्यांनी सलमान खानच्या घरावरही गोळीबार केला होता. बाबा सिद्दिकी हे सलमान खानचे निकटवर्तीय आहेत. त्यांनी अनेकदा सलमानला मदत केली आहे. त्यामुळे बाबा सिद्दिकी यांच्यावर बिश्नोई गँगने गोळीबार केल्याचे बोललं जात आहे. सध्या याप्रकरणाचा तपास सुरु आहे.