‘तुमचं रक्ताचं नातं ना, बाळासाहेबांकडे तुमची मागणी काय होती, सांगा लोकांना’; छगन भुजबळांचा ठाकरेंना सवाल

| Updated on: Jun 14, 2024 | 10:07 PM

राज्याच्या राजकारणात कायम चर्चेत असलेले नेते छगन भुजबळ यांनी टीव्ही९ मराठीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघाचं तिकीट न मिळण्याबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली. त्यासोबतच त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना शिवसेना पक्ष का सोडला असा प्रश्न विचारला आहे.

तुमचं रक्ताचं नातं ना, बाळासाहेबांकडे तुमची मागणी काय होती, सांगा लोकांना; छगन भुजबळांचा ठाकरेंना सवाल
Follow us on

शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक केल्याचा दाखला देत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. यावर छगन भुजबळ यांनी टीव्ही९ मराठीचे संपादक उमेश कुमावत यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यावेळी काय घडलं होतं हे सर्व सविस्तर सांगत राज ठाकरेंना सवाल केला आहे. साहेबांचे आमचे मतभेद होते नंतर आम्ही एकत्र आलो पण घरातील सदस्य असलेल्या राज ठाकरे यांनी शिवसेना का सोडली? त्यावेळी काय मागण्या केल्या होत्या? हे त्यांनीच समोर येऊन सांगावं असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

छगन भुजबळांचा राज ठाकरेंना सवाल

माझ्याबद्दल बोलता मग राज ठाकरे शाळेत असताना, ते लवकर आले नाहीत तर मासाहेब आणि बाळासाहेब ठाकरे जेवत नव्हते. तुमचं रक्ताचं नाते आहे ना, तुमचे मतभेद कशावरून झाले, झाले तरी तेव्हा शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची होती. तुमचे मतभेद काय होते, तुमची मागणी काय होती, सांगा लोकांना, मतभेद असले तरी सांभाळून घ्यायला नको का असं म्हणत राज ठाकरेंनी शिवसेना सोडून चूक केल्याचं भुजबळ म्हणाले.

बाळासाहेबांनी त्यावेळी काहीतरी सांगितलं असतं की तु हे नाही तर ते काम कर, ज्याला लहानपणापासून सांभाळलं, ज्याच्यासाठी मी काहीवेळा  जेवलो नाही त्याने असं करावं. बाळासाहेब ठाकरेंच्या मनाला काय वाटलं असेल.  राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली तेव्हा मी उद्धव आणि राज दोघांनाही फोन केला आणि बोललो की पाच ते सहा दिवस एकमेकांना काही बोलू नका. राग हा त्या क्षणापुरता असतो, राग शांत झाला की मन  बदलतं. दोघांनीही ऐकलं काही दिवस एकमेकांवर बोलले नाहीत पण मतभेत झाले आणि राज ठाकरेंनी आपला निर्णय घेतल्याचं भुजबळांनी सांगितलं.

बाळासाहेबांना मातोश्री हेच तुरूंग समजून तिथे ठेवा- भुजबळ

मी त्यावेळी विरोधी पक्षामध्ये होतो तेव्हा बाळासाहेबांनी माझ्यावर टीका केली मी त्यांच्यावर केली. शिवाजी पार्क मैदानावर जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. तेव्हा सभेत आम्ही सर्वांनी श्रीकृष्ण कमिशनचा जो अहवाल आहे त्याची आम्ही अंमलबजावणी करू असं जाहीर सभेत म्हटलं होतं. त्यामुळे नंतर जेव्हा पोलिसांनी माझ्यावर फाईल ठेवली तेव्हा माझ्यासमोर प्रश्न होता की मी नाही कसं बोलणार, त्या काळात दंगे आणि बॉम्बस्फोट झाल्याच्या त्यासंदर्भातील केस होत्या. यामध्ये साहेबांचंही नाव होतं.  तेव्हा तत्कालीन मुंबईचे पोलीस कमिशनर होते त्यांना सांगितलं होतं की, बाळासाहेबांना कस्टडीमध्ये ठेवायचं नाही. जामीन मिळत असेल तर देऊन टाका. हे शक्य नाहीच झालं तर बाळासाहेबांना मातोश्री हेच तुरूंग समजून तिथे ठेवा, असं भुजबळ यांनी सांगितलं.