मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे शुक्रवारी अंमलबजावणी संचलनालयाच्या (ED) चौकशीला सामोरे जाणार आहेत. गेल्या महिन्यात 30 डिसेंबरला ‘ईडी’कडून एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. मात्र, त्यानंतर एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ईडीची चौकशी लांबणीवर पडली होती. अखेर क्वारंटाईनचा कालावधी संपल्यानंतर आज एकनाथ खडसे ‘ईडी’समोर हजर होतील. (NCP leader Eknath Khadse will face ED probe today)
सकाळी साधारण 11 च्या सुमारास एकनाथ खडसे ईडीच्या कार्यालयात पोहोचतील असे सांगितले जात आहे. पुण्यातील भोसरी येथील ‘एमआयडीसी’च्या जमीन खरेदी प्रकरणासह अन्य प्रकरणांमध्ये खडसे यांची चौकशी होणार आहे. त्यामुळे आता खडसे यांच्या या चौकशीतून काय निष्पन्न होणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
खडसे यांनी कुटुंबीयांच्या नावे पुण्यातील भोसरी येथे खरेदी केलेल्या जमिनीमुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. या प्रकरणामुळे एकनाथ खडसे यांना फडणवीस सरकारमधील महसूल मंत्रिपद सोडावे लागले होते. नंतरच्या काळात एकनाथ खडसे हे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचा पुणे व नाशिक विभाग, प्राप्तीकर विभाग आणि झोटिंग समितीच्या चौकशीला सामोरे गेले होते. मात्र, या तिन्ही यंत्रणांकडून एकनाथ खडसे यांना क्लीन चिट देण्यात आली होती.
एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतेवेळीच आपल्यामागे ईडीचा ससेमिरा लागण्याची शक्यता व्यक्त केली होती. मात्र, भाजपने ईडी लावली तर आपण सीडी लावू, असा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला होता. मला एकदा जयंत पाटील यांनी विचारलं की तुम्ही राष्ट्रवादीत येणार का? तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही घेतलं तर येईन. तर त्यावेळी जयंत पाटील म्हणाले, तुम्ही आलात तर ते तुमच्यामागे ईडी लावतील, असे आमचे गमतीत बोलणं सुरु होतं. पण आता सांगतो जर त्यांनी ईडी लावली, तर मी सीडी लावीन, असे खडसे यांनी म्हटले होते.
संबंधित बातम्या :
भोसरी भूखंड प्रकरणात नोटीस, 30 डिसेंबरला ईडी कार्यालयात हजर राहणार, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया
एकनाथ खडसे यांना कोरोना, खासगी चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह
भोसरी भूखंड प्रकरणी खडसेंची ईडी चौकशी, तारीख आणि वेळ ठरली
(NCP leader Eknath Khadse will face ED probe today)