देशाचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांचा विजय झाला. त्यानंतर बारामतीत बॅनरबाजी करण्यात आली. युगेंद्र पवार यांनीही बारामतीत बॅनर लागले होते. यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते उमेश पाटील यांनी भाष्य केलंय. अमिताभ बच्चन हा अमिताभ बच्चन असतो. त्याच्याजागी आसरानी गेला तर त्याचा पिक्चर किती फ्लॉप होईल हे सांगायची गरज नाही. एखादा चित्रपट फ्लॉप झाला म्हणून अमिताभ ची उंची कमी होत नाही. त्यामुळे एकच दादा अजित दादा आहे. दुसरा कोणी दादा होणार नाही, असं उमेश पाटील म्हणालेत.
बारामतीकरांनी एकच विचार केला आहे की लोकसभेत पवारांना पाठवायचे आणि विधानसभेत देखील पवारांनाच पाठवायचे. शरद पवारसाहेबांचं वय आणि योगदान पाहता पवार साहेबांना दुखवायला नको, म्हणून बारामतीकरांनी त्यांना मत दिलं. अजितदादांनी बारामतीसाठी काय केलंय हे सर्व बारामतीकरांना माहिती आहे, असं उमेश पाटील यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादीचे नेते भाजपच्या चिन्हावर लढतील, असं रोहित पवार म्हणाले होते. त्यांच्या टीकेला उमेश पाटील यांनी उत्तर दिलंय. रोहित पवार हे एका विजयामुळे हुरळून गेले आहेत. त्यामुळे ते काहीही बरळत आहेत. अश्या प्रकारचा कोणताही प्रस्ताव भाजपकडून किंवा आमच्याकडून नाही. आम्ही विशिष्ट प्रकारचे मुद्दे घेऊन भाजपसोबत युतीमध्ये आहोत. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शीर्षस्थ नेत्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेस सह इतर पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचे सूतोवाच केले होते, असं ते म्हणाले.