मुंबई : राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेवर विधानसभा अध्यक्षांनी निकाल वाचनाला सुरूवात केल्यावर निर्णय कोणाच्या पारड्यात जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. आमदार अपात्रतेबाबत निकाल देतान शिवसेनेप्रमाणे दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठेवण्याचा निर्णय देण्यात आला आहे. शरद पवार गटाला दिलासा देणारं आहे मात्र राष्ट्रवादी पक्ष हा अजित पवार यांचा असल्याचा ऐतिहासिक निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे.
विधीमंडळ सदस्यांची संख्या पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडे 41 आमदारांचं पाठबळ आहे. पक्षीय रचना पाहता कुठला गट हा राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करतो, हे प्रथमदर्शनी सांगता येणार नाही. पण विधीमंडळ गटाचे पाठबळ पाहता अजित पवार गट हाच राजकीय पक्ष आहे असे दिसते, याच निरीक्षणाच्या आधारावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा निकाल दिल्याचं सांगितलं.
नवनवीन पक्षांसोबत आणि विचारसरणी सोबत हल्ली युती आणि आघाडी होताना आपण पाहत आहोत. प्रत्येक घटनेवर दहाव्या सूचीनुसार कार्यवाही करता येत नाही. अजित पवार आणि शरद पवार गटामध्ये पक्षांतर्गत वाद आहे. कोणीही पक्ष सोडलेला नाही, त्यामुळे दहाव्या सूचीनुसार कार्यवाही करता येत नसल्याचं राहुल नार्वेकर यांनी सांगितलं.
राष्ट्रवादीच्या घटनेबाबत काहीच वाद नाही. 30 जून 2023 ला या पक्षात फूट पडली. अशावेळी नेतृत्त्वाबाबत पक्षाची घटना काय सांगते हे महत्त्वाचं आहे. अध्यक्ष, वर्किंग कमिटी आणि नॅशनल कमिटी ही पक्षाची निर्णायक पद्धत दर्शवते, असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे. तसेच शरद पवार गटाने प्रतिनिधी निवडल्याचे कोणतेच पुरावे दिले नाहीत, असंही नार्वेकर यांनी म्हटलं आहे.