मुंबई : बागेश्वर बाबा (Bageshwar Baba) यांनी शिर्डीच्या साईबाबा यांच्याविषयी केलेल्या एका वक्तव्याचे पडसाद राज्यासह देशभरात पडताना दिसत आहेत. बागेश्वर बाबा यांनी साईबाबा यांच्याविषयी केलेल्या दाव्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण तापताना दिसत आहे. विशेष म्हणजे बागेश्वर बाबा यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) चांगलेच संतापले आहेत. त्यांनी संतापात बागेश्वर बाबा यांना थेट चॅलेंज देऊन टाकलं आहे. त्यामुळे बागेश्वर बाबा यांच्या वक्तव्यावरुन महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
“मी पक्षविरहित बोलत असून मी स्वतः एक साईबाबांचा मोठा भक्त आहे. मी गेल्या अनेक वर्षांपासून शिर्डीत जातोय. माझ्या देवघरात देखील साईबाबांची आणि श्री स्वामी समर्थांची मूर्ती आहे. त्यांची दररोज आमच्या पद्धतीने आम्ही पूजा करतो. मी घरातून बाहेर पडताना त्यांच्या चरणी मस्तक ठेवून हात जोडून घराबाहेर पडतो. मी त्यांना देव मानतो. हा बागेश्वर कोण सांगणार की त्यांना देव मानू नका”, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी सुनावलं.
“तुम्ही माझ्या देवाला लांडगा म्हणणार? लांडग्यावर वाघाची कातडी घातली की लांडगा वाघ होत नाही. कोण हा बागेश्वर साईबाबांना असं बोलणारा? सबका मालिक एक म्हणणारा तो साईबाबा. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्मलेल्या तो साईबाबा. आज लाखो फक्त लाईन लावून त्याच्या दर्शनाला जातात ते काय वेडे आहेत? हा बागेश्वर एकटा हुशार आहे का? आम्ही गुरुवारी रात्री सर्वजण जाऊन वर्तक नगरच्या शिर्डी साईबाबांच्या प्रतिकृती असलेल्या मंदिरात साईबाबांची आरती करणार आहोत. असेल हिम्मत बागेश्वर तर येऊन थांबून दाखव”, असं चॅलेंज जितेंद्र आव्हाड यांनी दिलं.
“शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेनंतर भाजपकडून त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडण्यात आले. मनुस्मृतिप्रमाणे जे क्षुद्र असतात त्यांचा स्पर्श झाल्यानंतर जर तुम्हाला पवित्र व्हायचं असेल तर गोमूत्र शिंपडतात, असं म्हटलं जातं. आता तिथे सगळ्या बहुजनांचा समाज आहे ना आणि बहुजन शूद्र आहेत हे परवा काळाराम मंदिरामध्ये देखील पुजाऱ्यांनी जाहीर केलं”, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.
“इतिहासपण साक्ष आहे की बहुजन शूद्र आहे आणि सनातनी तसं मानतात. भाजपने सनातनी धर्माप्रमाणे आणि सनातनी व्यवस्थेमुळे ते गोमूत्र शिंपडलं. त्या सभेला लाखभर लोक होते. त्या लाखभर लोकांवर देखील गोमूत्र शिंपडा. औरंगाबादमध्ये गाई घेऊन या. त्यांचे मूत्र काढून जेवढे सभेला आले होते त्यांच्या अंगावर शिंपडा. चांगली पद्धत आहे”, असा टोला त्यांनी लगावला.