विधानसभा निवडणूक 2024 ची आचारसंहिता पुढील महिन्यात लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यापूर्वी राज्यात घडामोडींना ऊत आला आहे. केंद्रीय नेतृत्वाचे राज्यातील दौरे वाढले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीत सीट शेअरिंगची घडी बसविण्याचे डावपेच सुरू आहे. कधी गोड, कधी कडू अनुभव गाठीशी बांधत दोन्ही गटात जमवाजमव सुरू आहे. त्यातच आता राष्ट्रवादी पक्षात फुटीनंतर पक्ष आणि पक्ष चिन्हावरुन पुन्हा एकदा घमासान दिसेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह या प्रकरणाचा सुप्रीम कोर्टातील निकाल लागत नाही तोपर्यंत असा तोडगा काढण्याची विनंती शरद पवार गटाने केली आहे. काय आहे हे प्रकरण?
अजित पवार गटाला द्या नवीन चिन्ह
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह या प्रकरणाचा सुप्रीम कोर्टातील निकाल लागत नाही तोपर्यंत अजित पवार यांना नवीन चिन्ह द्या. अजित पवार यांना नवीन चिन्ह घेण्याची मागणी करायला सांगा. निवडणूक आयोगाने जो निकाल दिला आहे तो आमदारांच्या आधारावर दिला आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना (अजित पवार) यांना नवीन चिन्ह घेण्यास सांगावं, अशी विनंती सुप्रीम कोर्टात करण्यात आली आहे. या नवीन घडामोडीमुळे आता राजकीय वातावरण तापणार आहे.
मग सुनावणी तरी कधी?
शरद पवार यांच्या पक्षाकडून शुक्रवारी सुप्रीम कोर्टासमोर प्रकरण समोर आणण्यात आले. हे प्रकरण लवकर ऐकण्याची विनंती शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टाकडे केली आहे. या प्रकरणावर २५ सप्टेंबर रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. कोर्ट नक्की सुनावणी कधी घेणार हे आज येणाऱ्या कोर्टाच्या प्रकरण यादीवरुन स्पष्ट होईल. यापूर्वी देखील २ वेळा शरद पवार यांच्या पक्षाकडून हे प्रकरण मेंशन करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण त्यावर सुनावणी झाली नाही.
असा बसला होता फटका
लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार गटाला अपक्षांचा मोठा फटका बसला होता. शरद पवार गटाला निवडणुकीत तुतारी हे चिन्ह मिळाले होते. त्यावर पक्षाने निवडणूक लढवली होती. तर काही अपक्षांना तुतारी सदृश्य ट्रंपेट हे चिन्ह मिळाले होते. त्यांनी त्यावर निवडणूक लढवली होती. या चिन्हामुळे मतदार संभ्रमीत झाला आणि शरद पवार गटाची मतं अपक्षांनी मिळाली. त्यामुळे लोकसभेतील आमच्या गटाचा उमेदवार थोड्या फरकाने पडल्याचा दावा शरद पवार गटाने यापूर्वी केला होता.