लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात घडामोडींना वेग आला आहे. लोकसभा निवडणुकीतील जय- पराजयाच आढावा घेतल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. निवडणूक चिन्हाबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाने हे पत्र लिहिलं आहे. पिपाणी हे चिन्ह निवडणुकीच्या चिन्हाच्या यादीतून वगळावं, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. पिपाणी या चिन्हामुळं या निवडणुकीत आम्हाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे या बाबात निर्णय घ्या. अन्यथा आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार, असं या पत्रात म्हणण्यात आलं आहे
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने निवडणूक आयोगाला पत्र लिहित निवडणूक चिन्हाबाबतची महत्वाची टिपण्णी केली आहे. ‘पिपाणी’ हे चिन्ह निवडणुकीच्या चिन्हाच्या यादीतून काढून टाकावं. या चिन्हामुळे राष्ट्रवादी पक्षाचं लोकसभा निवडणुकीमध्ये मोठं नुकसान झालं आहे, असं या पत्रात म्हणण्यात आलं आहे. याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा न्यायालयाचं दार ठोठावणार असल्याचा या पत्रात उल्लेख आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने यंदाची लोकसभा निवडणूक ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या चिन्हावर लढवली. मात्र या निवडणुकीत काही अपक्ष उमेदवारांना ‘पिपाणी’ चिन्ह देण्यात आलं होतं. यामुळे पक्षाचं मोठं नुकसान झालं असं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं म्हणणं आहे. साताऱ्याची जागा राष्ट्रवादीच जिंकणार होती मात्र ‘पिपाणी’ चिन्हामुळे ती जागा हातातून गेली, असं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे. ‘तुतारी वाजवणारा माणूस’ आणि ‘पिपाणी’ या चिन्हांमध्ये साधर्म्य आहे. यामुळे सामान्य लोकांना यातील फरक लवकर लक्षात येत नाही. यामुळे नुकसान होत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत याचा फटका बसू नये म्हणून शरद पवार गटाने याबाबतचं पत्र निवडणूक आयोगाला लिहिलं आहे.
अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्हावरही त्यांनी दावा सांगितला. निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या बाजूने निर्णय दिला. तर शरद पवार गटाला ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे चिन्ह देण्यात आलं आहे.