मुंबई: धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावरील बलात्काराचे आरोप हे गंभीर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला एक पक्ष म्हणून याचा गांभीर्याने विचार करावा लागेल. याप्रकरणात कोर्ट आणि पोलीस काय कारवाई करायची ती करतील. पण पक्ष धनंजय मुंडे यांच्याबाबत लवकरच निर्णय घेईल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले. ( NCP leader Sharad Pawar on Dhananjay Munde)
ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे आणि नवाब मलिक यांच्यावरील आरोपांसंदर्भात सविस्तरपणे भाष्य केले. धनंजय मुंडे हे बुधवारी मला भेटले. मुंडे यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मला सविस्तर माहिती दिली. त्यानुसार धनंजय मुंडे यांचे काही व्यक्तींशी संंबंध होते. त्यावरुन मुंडे यांच्याविरोधात काही तक्रारी करण्यात आल्या. हे प्रकरण या दिशेने जाईल, याची कल्पना धनंजय मुंडे यांना होती. त्यामुळेच धनंजय मुंडे यांनी यापूर्वीच उच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि आदेश प्राप्त करुन घेतला होता. त्यामुळे आता याप्रकरणात फारसे बोलण्यासारखे काहीही नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.
आता धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांबाबत बोलायेच झाल्यास ते गंभीर स्वरुपाचे आहेत. एक पक्ष म्हणून या सगळ्याचा आम्हाला गांभीर्याने विचार करावा लागेल. पक्षातील प्रमुख सहकाऱ्यांशी माझं अद्याप बोलणं झालेलं नाही. मात्र, मी त्यांना विश्वासात घेऊन धनंजय मुंडे यांनी मला दिलेली माहिती त्यांच्यापुढे मांडणार आहे. त्यानंतर आम्ही धनंजय मुंडे यांच्याबाबत निर्णय घेऊ असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. मात्र, त्यासाठी फार वेळ लागणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस तातडीने निर्णय घेईल, असेही शरद पवार यांनी सांगितले.
शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांचा निर्णय पक्षावर सोडून दिला असला तरी मंत्री नवाब मलिक यांची ठामपणे पाठराखण केली. नवाब मलिक हे राज्यातील महत्त्वाच्या मंत्र्यांपैकी एक आहेत. 25 वर्षांहून अधिक काळ ते विधिमंडळात आहेत. या काळात त्यांच्यावर एकदाही कोणतेही वैयक्तिक स्वरुपाचे आरोप झालेले नाहीत. त्यांच्या नातेवाईकावर आरोप झाले आहेत. त्या नातेवाईकाला संबंधित यंत्रणेने (NCB) अटक केली आहे.
या प्रकरणात आम्ही संबंधित यंत्रणेला पूर्णपणे सहकार्य करत आहे. आता एनसीबीने वस्तुस्थिती समोर आणणे गरजेचे आहे. तेव्हा आता एनसीबी योग्यप्रकारे काम करेल, अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली.
संबंधित बातम्या:
राजकारण्यांनी भान ठेवावं, धनंजय मुंडे प्रकरणात संजय राऊतांचं भाष्य
धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला का? शरद पवार म्हणतात
मोठी बातमी: धनंजय मुंडेंना चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये बोलावणार?