ठाणे ते मुलुंड रेल्वे स्थानकांदरम्यान नवीन रेल्वे स्थानकाची दीर्घ प्रतीक्षा आता संपली आहे. 2019 मध्ये या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली होत. परंतु, कामाचा वेग अतिशय संथ होता. मात्र, आता हे काम जलदगतीने पूर्ण होण्याची शक्यता आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रकल्पासाठी 185 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्याअंतर्गत प्लॅटफॉर्म बांधणे, ट्रॅक टाकणे आणि इतर आवश्यक सोई सुविधा आधी कामे केली जाणार आहेत.
2019 मध्ये हा प्रकल्प सुरू झाला. परंतु, आतापर्यंत केवळ 30 टक्के काम झाले आहे. आता डिसेंबर 2025 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या नवीन स्थानकामुळे ठाणे स्थानकावरील सध्याची गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. मुलुंड आणि घोडबंदर येथून सर्व रेल्वे प्रवासी ट्रेन पकडण्यासाठी ठाणे स्थानकावर पोहोचतात. त्यामुळे येथे खूप गर्दी असते. मात्र, आता ठाणे ते मुलुंड दरम्यान होणाऱ्या नवीन स्थानकामुळे प्रवाशांना जवळच्या स्थानकावरून ट्रेन पकडता येणार आहे.
ठाणे आणि कल्याण येथील शिवसेना खासदार नरेश म्हस्के आणि डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी नवी दिल्लीतील रेल्वे भवन येथे रेल्वेमंत्री वैष्णव यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या रेल्वे स्थानकाच्या बांधकामासाठी एकूण 264 कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यापैकी रेल्वेमंत्री वैष्णव यांनी 185 कोटी रुपये मंजूर केले आहेत.
रेल्वेमंत्री वैष्णव यांनी मजूर केलेला हा निधी कार्यरत क्षेत्राचा विकास करण्यासाठी वापरला जाणार आहे. यामध्ये प्रशासकीय इमारतीचे बांधकाम, ट्रॅक टाकणे, प्लॅटफॉर्म तयार करणे आदी कामांचा समावेश असेल. स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत हा खर्च पूर्वी ठाणे महापालिकेने उचलायचा होता. मात्र, आता या खर्चाची जबाबदारी रेल्वे मंत्रालयाने उचलली आहे. ठाणे महापालिकेवर आधीच मोठा आर्थिक बोजा आहे. त्यामुळे हे काम लवकर पूर्ण करून पुढील विलंब टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, स्टेशन परिसराबाहेरील विकासाची जबाबदारी ठाणे महापालिकेला उचलावी लागणार आहे. यामध्ये रस्ते, महामार्गाला जोडणारे उन्नत रस्ते, पार्किंग आणि बस स्टँड आणि इतर सुविधांचा समावेश आहे.