Ajit Pawar : “अजित पवार यांना मुख्यमंत्री करायचंय, कामाला लागा”

| Updated on: Feb 10, 2023 | 11:22 PM

आता पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच आणि तेही अजितदादाच असं जाहीरपणे एका नेत्याने बोलून दाखवलंय.

Ajit Pawar : अजित पवार यांना मुख्यमंत्री करायचंय, कामाला लागा
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादीनं अजित पवारांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार करण्याचं ठरवलंय का? हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे आमदार निलेश लंकेंनीच जाहीरपणे तसं वक्तव्य केलंय. अजितदादांना मुख्यमंत्री करायचंय, त्यामुळं कामाला लागा असं आवाहन लंकेंनी कार्यकर्त्यांना केलंय. राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंकेंनी आता पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच आणि तेही अजितदादाच असं जाहीरपणे बोलून दाखवलंय. अजित पवारांना मुख्यमंत्री करायचंय, त्यासाठी कामाला लागा असं आवाहन निलेश लंकेंनी कार्यकर्त्यांना केलंय. निलेश लंके ज्यावेळी बोलत होते त्यावेळी अजित पवारही उपस्थित होते. त्यांच्यासमोरच अजित पवारांना आपल्याला मुख्यमंत्री करायचंय असं लंके म्हणाले.

अजित पवार पहिल्यांदा 2010 मध्ये उपमुख्यमंत्री झाले. नोव्हेंबर 2010 ते सप्टेंबर 2012 पर्यंत अजित पवार उपमुख्यमंत्री होते नंतर 2012 मध्ये डिसेंबर 2012 ते सप्टेंबर 2014 मध्ये अजित दादांनी उपमुख्यमंत्रिपद सांभाळलं. 23 नोव्हेंबर 2019 ला फडणवीसांसोबत पहाटेचा शपथविधी करत 72 तासांसाठी तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झाले.

Special Report | राष्ट्रवादीनं Ajit Pawar यांना मुख्यमंत्री करायचं ठरवलंय?

त्यानंतर लगेच महाविकास आघाडी सरकारमध्ये 30 डिसेंबर 2019 ते 29 जून 2022 पर्यंत अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. पण आता राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणि आमदारांनाही वाटतंय की, अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत. मात्र मुख्यमंत्रीपदाबद्दल स्वत: अजित पवारांना काय वाटतंय हे त्यांनी tv9च्या मुलाखतीत सांगितलंय..

अजित पवार 4 वेळा उपमुख्यमंत्री झाले सध्या विरोधी पक्षनेतेही आहेत. मात्र अजित पवारांना मुख्यमंत्री होण्याची संधी आली नाही असंही नाही. 2004 मध्ये राष्ट्रवादीच्या अधिक जागा आल्या होत्या. 2004च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या 69 तर राष्ट्रवादीच्या 71 आमदार निवडून आले होते. त्यामुळं सर्वाधिक जागा त्याचा मुख्यमंत्री या सूत्रानुसार राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होईल असं वाटत होतं.

छगन भुजबळ, आर.आर पाटील. विजय सिंह मोहिते पाटील आणि अजित पवार शर्यतीत होते मात्र शरद पवारांनी राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपद न घेता 3 कॅबिनेटची अधिकची मंत्रिपद आणि महामंडळं राष्ट्रवादीच्या वाट्याला घेतली. त्यामोबदल्यात काँग्रेसला मुख्यमंत्रिपद दिलं आणि विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले.

2004 मध्ये वरिष्ठांच्या चुका झाल्याचं म्हणतं नुकतंच एका मुलाखतीत अजित पवारांनी हे मान्यही केलं होतं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही विधानसभेत याच मुद्द्यावरुन चिमटाही काढला. आता निलेश लंकेंनीही अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी चिमटे काढलेत.

दरम्यान, आतापर्यंत काँग्रेसोबतच्या आघाडीत काँग्रेसचे मुख्यमंत्री झालेत. महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंच्या रुपानं शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. आता राष्ट्रवादीच्या वाट्याला अर्थात तेही अजित पवार उपमुख्यमंत्री होणार का?…हे तर राजकीय समीकरण आणि राष्ट्रवादीच्या मॅजिक फिगवरच अवलंबून आहे.