मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Nitesh Rane) आणि शिवसेना यांचं राजकीय वैर आजपर्यंत महाराष्ट्राने वेगवेगळ्या रुपाने पाहिलं आहे. मात्र आता या वादाचा आणखी एक चॅप्टर सुरू झालाय. यावेळी त्याला कारण ठरललीय गिरगाव चौपाटीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी काही दिवसांपूर्वीच उद्घाटन केलेली गॅलरी. यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी आता थेट पालिका आयुक्तांना पत्र लिहलंय. राणे यांच्या घराला जिल्हाधिकारी यांनी सीआरझेड बाबत नोटीस दिल्यावर पालिकेच्या (BMC) विरोधात नितेश राणे आता आक्रमक मोडवर आले आहेत. त्यांनी या गॅलरीवरून फक्त पालिका आयुक्तांना पत्रच नाही लिहलं तर येत्या अधिवेशनात हक्काभंगाचा प्रस्ताव आणू असाही इशारा दिला आहे. त्यामुळे आता ही गॅलरीही पुन्हा चर्चेत आलीय. या गॅलरीच्या सीआरझेड परवानगीचा मुद्दा भाजप आमदार नितेश राणे यांनी उचलून धरलाय.
गिरगाव चौपाटीवर पालिकेने तयार केलेली व्ह्यूविंग गॅलरीला सीआरझेडची परवानगी नाही असा दावा करत राणे यांनी पुन्हा एकदा पालिकेला पत्राद्वारे माहिती दिलीय. तसेच याआधी सुद्धा नितेश राणे यांनी या गॅलरी बाबत आक्षेप घेतला होता पण पालिकेकडून त्याला उत्तरं देण्यात आलं नाही. त्यामुळे आता उत्तर न दिल्यानं येणाऱ्या अधिवेशनात आयुक्तांच्या विरोधात हक्कभंन्ग आणावा लागेल असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे. त्यामुळे राणे यांचं हे पत्र पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. आता पालिका प्रशासन राणे यांना उत्तर देणार की हे गॅलरी प्रकरण आता थेट अधिवेशनापर्यंत पोहोचणार? हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
या गॅलरीचे उद्घाटन काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले आहे. या उद्घाटनावेळी पर्यवरण मंत्री आदित्य ठाकरे तसेच उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे याही उपस्थित होत्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या गॅलरीची तसेच चौपाटीलगतच्या सर्व कामांची आदित्य ठाकरे यांच्यासोबत पाहणी केली होती. यावेळी आदित्य ठाकरे यांनी सर्व आवश्यक परवानगी घेतल्याचे सांगितले होते. तसेच याबाबत पालिकडूनही माहिती देण्यात आली होती. मात्र नितेश राणे यांनी हे पत्र पाठवल्याने आता पुन्हा हाच मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनातही गॅलरीवरून जोरदार खडाखडी होण्याची शक्यता आहे. सध्या मुंबई आणि मुंबईलगत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून विविध प्रकल्प सुरू आहेत. मात्र या परवानगी प्रकरणावरून आता भाजपकडून पालिका आणि शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न होत आहे.