विनायक डावरूंग, मुंबई | 18 नोव्हेंबर 2023 : लोअर परळ उड्डाण पुलावरुन राज्यात मोठे राजकारण सुरु झाले आहे. गेली पाच वर्षे बंद असलेल्या या उड्डाण पुलाची एक बाजू काही महिन्यांपूर्वी वाहनांसाठी सुरु करण्यात आली होती. आता दुसरी बाजू आदित्य ठाकरे यांनी परवा उघडी केल्यानंतर त्यांच्यावर पालिकेने आता गु्न्हा दाखल केला आहे. यावरुन मुंबईच्या एवढी चिंता असेल तर आदित्य ठाकरे यांनी बेल न घेता तुरुंगात जावे अशी टिका भाजपा नेते नितेश राणे यांनी केली आहे.
स्वत:ची सत्ता असताना आदित्य ठाकरे यांनी मुंबईकरांची एवढी चिंता कधी केली नाही. तेव्हा त्यांना बॉलीवूडच्या पार्ट्यांमधून कधी वेळ मिळायचं नाही. आणि रात्री डेव्हीड बॅकहमच्या मांडीवरून उतरून लोअर परळ ब्रिजचे अनधिकृतपणे उद्घाटन केले अशी टिका भाजपा नेते नितेश राणे यांनी केली आहे. ते पुढे म्हणाले की आदित्य ठाकरे यांनी लक्षात ठेवावे मुंबई त्यांच्या बापाची राहीलेली नाही. आता ती मुंबईकरांची आहे. इथे चमकोगिरी चालणार नाही. महायुतीचे सरकार आहे. इथे कोणीही नियम तोडला तर त्याला शिक्षा होणारच. आता एफआयआर दाखल झाली आहे. मुंबईकरांवर खरं प्रेम असेल तर आदित्य बेल न घेता जेलमध्ये जावे अशी टिका राणे यांनी केली.
नितेश राणे पुढे म्हणाले की आज काय तर उबाठाचे खासदार आणि नेते राष्ट्रपतींना भेटणार आहेत. कारण काय तर मराठा आरक्षणाचा प्रश्न राष्ट्रपतींनी सोडवावा त्यांना लक्ष घालावं असं संजय राऊत बोलले आहेत. हेच कारण आहे का ? त्यांना खरंच मराठा आरक्षणाची चिंता आहे का ? खरंच मराठ्यांच्या मुलाची चिंता आहे की आपल्या मालकाच्या मुलाची चिंता आहे? असा सवालही त्यांनी यावेळी केला
आमच्या माहीतीप्रमाणे सुशांत सिंग आणि दिशा सालियन केस संदर्भातील तक्रार त्या याचिकाकर्त्यांनी राष्ट्रपतींकडे केली आहे. तेथून कारवाई होण्याची शक्यता आहे. किंवा आदेश येण्याची शक्यता आहे असं आम्हाला ऐकायला आल्याचे नितेश राणे यावेळी म्हणाले. त्यामुळे ही भेट मराठा मुलांसाठी आहे की आपल्या मालकाच्या मुलाला सोडविण्यासाठी असा सवालही नितेश राणे यांनी केला आहे.
हे सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रसिद्धीसाठी हपालेले आहे अशी टिका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. यावर नितेश राणे यांनी म्हटले की संजय राऊत यांनी सकाळी फुल टॉस दिला आहे. 40 काय 40 हजार कामगार अडचणीत असले तरी हे सरकार त्यांच्याकडे ढुंकूनही पाहणार नाही. मुंब्रा येथे शिवसेना शाखेकडे जाताना शिवसैनिक अडचणीत होते, पोलिसांबरोबर संघर्ष करत होते. अंगावर केसेस घेत पक्षप्रमुख म्हणून तिथे होते तेव्हा आदित्य ठाकरेंना तेथे जाण्याचे का सुचले नाही ? शिवसैनिकांना तिथे येऊन ताकद दाखवावी असे वाटले नाही, दुसऱ्या दिवशी बॉलीवूडच्या पार्टीत डेव्हीड बॅकहेम बरोबर गजऱ्याचा वास घेताना आम्हाला पार्टीत हातात ग्लास घेऊन पार्टीत कोपऱ्यात दिसले. त्यामुळे जर पंतप्रधान उद्याच्या मॅचला हजर राहून भारतीय संघाचे मनोबल वाढवित असतील तर राष्ट्रप्रेमी पंतप्रधानांचाट आम्हाला सार्थ अभिमान आहे असे भाजप नेते नितेश राणे यांनी म्हटले आहे.