मुंबई: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (navneet rana) यांना कोणत्याही प्रकारची हीन वागणूक दिली नाही. त्यांचा कोठडीत कोणत्याही प्रकारचा छळ झाला नाही, असं सांगतानाच राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्रं लिहिलं आहे. त्यावर लोकसभा अध्यक्षांनी फॅक्च्युअल रिपोर्ट मागितला आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या डिटेलमध्ये मी जाणार नाही. लोकसभा अध्यक्षांना (lok sabha speaker) याबाबतचा रिपोर्ट पाठवला जाईल, असं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) यांनी सांगितलं. मागासवर्गीय असल्यामुळे राणा यांना पाणी दिलं नाही अशी त्यांची तक्रार आहे. या संदर्भात मी चौकशी केली आहे. पण वस्तुस्थिती तशी दिसत नाही. कुणाचं काही म्हणणं असलं तरी पोलीस कायद्यानेच निर्णय घेतात. कारवाई करतात, असंही वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं. दिलीप वळसे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.
दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेवरही भाष्य केलं. या संदर्भात एक दोन दिवसात औरंगाबादचे पोलीस आयुक्त निर्णय घेतील. पोलीस आयुक्त हे त्यांचे सहकारी आणि पोलीस महासंचालकांशी चर्चा करत आहेत. परिस्थिती पाहून तेन निर्णय घेतील, असं वळसे पाटील यांनी सांगितलं.
भोंग्यांबाबत काल बैठक झाली. त्यात सांगोपांग चर्चा झाली. त्यानंतरही त्यांना सभा घ्यायची असेल तर त्याबाबतचा निर्णय पोलीस आयुक्त घेतील. परवानगी द्यायची की नाही हा पोलीस आयुक्तांचा अधिकार आहे. ते निर्णय घेतील. सरकार निर्णय घेणार नाही, असं सांगतानाच कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम कोणी करत असेल तर सरकार कारवाई करणार, असा इशाराही त्यांनी दिला.
शुट अँड साईटच्या आदेशाची चर्चा आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. असे काही आदेश दिले असेल असं वाटत नाही. पोलिसांनी संरक्षण करायचं असतं. महाराष्ट्र पोलीस किंवा सीआयएसएफ असेल अशा पद्धतीने निर्णय घेत नसतात. तरीही मी माहिती तपासून बोलतो, असं त्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्रातील पोलीस कायद्यानुसार काम करतात. त्यांच्या अधिकारात काम करतात. मुंबई पोलीस चांगल्या कामासाठी ओळखल्या जाते. ओळखली जाणार. प्रोफेशनली त्यांनी काम करावं. हे त्यांना सांगितलंय, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
विरोधक राज्य अस्थिर करू पाहत आहे का? असा सवाल केला असता महाराष्ट्रात अशांतता निर्माण करण्याचे वारंवार प्रयत्न सुरू आहेत. हे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही. जेव्हापासून महाराष्ट्रात आमचं सरकार आलं. तेव्हापासून विरोधक खूश नाहीत. त्यामुळे या ना त्या कारणाने सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सरकार पाडण्याची त्यांची टॅक्टिस सुरू आहे, असंही ते म्हणाले.