मुंबई : चीनमध्ये लागण झालेल्या कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला एकही रुग्ण महाराष्ट्रात नसल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली (No Corona virus suspect in Maharashtra). राजेश टोपे म्हणाले, “राज्यशासनाच्यावतीने याबाबत खबरदारीचा उपाय घेण्यात येत आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थर्मल स्कॅनरद्वारे प्रवाशांची तपासणी केली जात आहे. गेल्या 7 दिवसांमध्ये एकूण 1739 जणांची तपासणी करण्यात आली. त्यातील 6 जण महाराष्ट्रातील होते. त्यात आतापर्यंत एकही संशयीत रुग्ण आढळून आलेला नाही (No Corona virus suspect in Maharashtra).”
तपासणी केलेल्या प्रवाशांपैकी मुंबईतील 2 प्रवाशांना घरी गेल्यानंतर सौम्य सर्दी आणि तापाची लक्षणे आढळून आली. त्यामुळे त्यांना कस्तुरबा रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे, अशीही माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. महिन्याभरापूर्वी चीनमध्ये कोरोना व्हायरसची लागण झाली. याची आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटनेनेही दखल घेत जगभर खबरदारीचा इशारा दिला आहे. राज्यात केंद्र शासनाच्या मदतीने त्यासंदर्भात उपाययोजना राबवण्यात येत आहेत.
कोरोना व्हायरस बाधीत देशांतून आलेल्या प्रवाशांची तपासणी झाल्यानंतर पुढील 28 दिवस त्यांचा दैनंदिन पाठपुरावा करण्यात येतो. अशा प्रवाशांना कोरोनासदृष आजाराची लक्षणे जाणवतात का, अशी विचारणा केली जाते. या विषाणुची लागण झाली आहे की नाही याची तपासणी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही) पुणे येथे करण्यात येणार आहे. संशयित रुग्णांना भरती करण्यासाठी मुंबईमध्ये कस्तुरबा रुग्णालय आणि पुण्यामध्ये नायडू रुग्णालयात विलगीकरण उपचार सुविधा करण्यात आली आहे.
राज्यातील ज्या नागरिकांनी गेल्या 14 दिवसांमध्ये चीनच्या वुहान प्रांतात प्रवास केला असेल अशा नागरिकांना सर्दी, ताप जाणवत असेल, तर त्यांनी जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन तपासणी करावी, असे आवाहन आरोग्यमंत्री टोपे यांनी केलं. राज्यात एकही संशयीत रुग्ण सापडला नाही, असं स्पष्ट करत त्यांनी नागरिकांना न घाबरण्याचं आवाहन केलं.
कोरोना व्हायरस काय आहे?
कोरोना व्हायरस हा श्वसनसंस्थेशी निगडीत आजार असून यामध्ये सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणं आढळतात. मोनिया, मुत्रपिंड निकामी होणे अशीही लक्षणं आढळतात. शिंकण्यातून, खोकल्यातून, हवेवाटे हा विषाणू पसरतो.
यावर खबरदारीचा उपाय म्हणून हात वारंवार धुणे. शिंकताना किंवा खोकताना नाकातोंडावर रुमाल धरणे. फळे, भाजीपाला स्वच्छ धुऊन खाणे, अशी खबरदारी घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.