मुंबई: येणाऱ्या काळात देशभरातील गैरभाजपा शासित राज्यातील सर्व मुख्यमंत्री मुंबईत येणार आहेत. महागाईपासून ते बेरोजगारीपर्यंत आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडीवर या बैठकीत चर्चा होणार आहे. खुद्द शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्याबाबतची आज माहिती दिली आहे. मुंबईत विरोधकांची एक बैठक होणार आहे. या बैठकीची आम्ही तयारी सुरू केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधकांची बैठक घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार ही बैठक होत आहे. स्वत: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) हे या बैठकीसाठी पुढाकार घेणार आहेत. या बैठकीला सर्व विरोधक आणि गैरभाजपा राज्यातील मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत महागाईपासून बेरोजगारी पर्यंतच्या सर्व विषयावर चर्चा होणार असून त्यातून निष्कर्ष काढण्यात येणार आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं. ते मीडियाशी संवाद साधत होते.
शांत असलेल्या महाराष्ट्रात काल काही लोकांनी शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी सर्व परिस्थिती हाताळली. त्यांनी काहीच होऊ दिलं नाही. यापुढे होऊ देणार नाही. राम आणि हनुमानाच्या नावाने दंगल घडवण्याचा त्यांचा हेतू होता. नवे हिंदू ओवैसी ते करत आहेत. त्यामुळे विरोधी पक्षाने चिंता व्यक्त केली आहे. पंतप्रधानांनी जातीय तणाव निवळण्यासाठी आवाहन करायला हवं. पंतप्रधानांचं या वातावरणाला समर्थन आहे का? नसेल तर समोर येऊन मन की बात सांगा, असं आवाहन राऊत यांनी केलं.
यावेळी त्यांनी दिल्लीतील हिंसेवरूनही प्रतिक्रिया व्यक्त केली. राजकीय फायद्यासाठी, निवडणूक जिंकण्यासाठी देशातील वातावरण खराब केलं जात आहे. ते देशासाठी योग्य नाही. काल दिल्लीत हनुमान जयंतीच्या मिरवणुकीवर हल्ला झाला. यापूर्वी असं कधीच झालं नव्हतं. शांततेत उत्सव साजरे केले जात होते. मिरवणूक काढण्याचा हक्क सर्वांना आहे. पण कालचे हल्ले प्रायोजित आहेत. राजकीय स्पॉन्सर्ड हल्ले आहेत. हिंदू मुस्लिम दंगे व्हावेत यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहे. भारत-पाक चालणार नाही, अयोध्या चालणार नाही, सर्जिकल स्ट्राईक चालणार नाही, त्यामुळेच हा प्रकार सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
यावेळी त्यांनी जेम्स लेन प्रकरणावर बोलण्यास नकार दिला. मी काही इतिहासाचा अभ्यासक नाही. जेम्स लेनने काय लिहिलं ते माहीत नाही. मी त्यावर बोलणार नाही. पुरंदरे हे त्यांच्या वतीने खुलास करण्यासाठी जिवित नाही. बाजू मांडण्यासाठी जिवित नाही त्यांच्याबाबत बोलणं योग्य नाही, असं त्यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या:
Raj Thackeray : भोंगे ते अयोध्यावारी, राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील 5 मोठे मुद्दे