मुंबई: राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यामुळे ठाकरे सरकारने 15 ऑगस्टपासून मुंबईकरांना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा दिली होती. मात्र, पहिल्या दोन दिवसांत निर्बंध शिथील होऊनही ट्रेनमध्ये पहिल्यासारखी गर्दी होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. अर्थात याला कारणही तसेच आहे.
राज्य सरकारकडून कोरोना लसीचे दोन डोस घेऊन 15 दिवस उलटलेल्या लोकांना ट्रेनचे पास दिले जात आहेत. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या सामान्य नागरिकांचे प्रमाण फारच कमी आहे. सध्या लोकल ट्रेनने ज्येष्ठ नागरिक आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी मोठ्याप्रमाणावर प्रवास करताना दिसत आहेत. मात्र, त्यांना पूर्वीपासूनच लोकल प्रवासाची मुभा होती. त्यामुळे 15 ऑगस्टनंतर लोकल ट्रेन सामान्यांसाठी खुली होऊनही अजूनही गर्दीचे प्रमाण फारसे वाढलेले नाही.
सध्या मुंबईत कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 2030546 इतकी आहे. यामध्ये 300342 फ्रंटलाईन वर्कर्सचा समावेश आहे. तर 672342 ज्येष्ठ नागरिकांनी आतापर्यंत कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. कोरोना लसीचा दुसरा डोस पूर्ण झालेल्या 45 वर्षांवरील नागरिकांची संख्या 864714 इतकी आहे. तर 18 ते 44 वयोगटातील 173825 नागरिकांना आतापर्यंत कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत.
मुंबईनंतर पुणे ते लोणावळा मार्गावर लोकल प्रवासासाठी लसीचे दोन डोस झालेल्या प्रवाशांना परवानगी देण्यात आली आहे. महापालिका किंवा नगरपरिषदेकडून त्यासाठीचे पासेस वितरीत केले जातील. त्यानंतर रेल्वेतर्फे त्यांना मासिक पास उपलब्ध करून देण्यात येईल. पुणे – लोणावळा मार्गावर सकाळी आणि संध्याकाळी सध्या लोकलच्या चार फेऱ्या सुरू आहेत. दुसरा डोस होऊन 14 दिवस झालेल्या नागरिकांनाही प्रवास करता येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिली.
संंबंधित बातम्या:
कोरोना लसीकरणात महाराष्ट्राची घोडदौड सुरुच, आतापर्यंत 5 कोटी डोस दिले
18 वर्षाखालील मुला-मुलींना मॉलमध्ये प्रवेशासाठी आधार-पॅनकार्ड, शाळा-महाविद्यालयाचे ओळखपत्र आवश्यक
मुंबईतील कोरोना नियंत्रणात आणणाऱ्या पालिका अधिकाऱ्यालाच कोरोनाचा संसर्ग, प्रकृती स्थिर