मुंबई : सायन-पनवेल महामार्गावरील रस्त्याचे काम सुरु असल्याने तेथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे वाहतूक कोडींने येथील प्रवाशांचे हाल होत आहे. या वाहतूक कोडींतून प्रवाशांची मुक्तता व्हावी यासाठी तेथील काम वाहतूक पोलीस करत नसून चक्क मानव यंत्र (रोबोट) करत आहे.
मुंबईसह ठाणे, नवी मुंबई शहरातही मोठ्या प्रमाणात आज रस्त्यावर खड्डे पडले आहेत. आतापर्यंत या खड्ड्यांमुळे अनेक अपघात झालेले आहेत तर काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. यासाठी महामार्गावरील प्रवास खड्डेमुक्त व्हावा यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सायन-पनवेल महामार्गावरील उड्डाणपुलावर काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. काँक्रीटीकरणच्या कामामुळे सायन पनवेल महामार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे.
या कामकरीता कंपनीला वॉर्डन किंवा वाहतूक पोलीस कर्मचारी ठेवावा लागत होता. परंतू काम सुरू झाल्यापासून तीन जणांना वाहनांनी धडक दिल्याने हे काम अतिशय जोखमीचे झाले होते. अश्यावेळी हा मानवयंत्र वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहनांना योग्य दिशा दाखवणे आणि त्यांना वाहने सावकाश चालविण्याचा संदेश देत आहे. यामुळे अपघाताचा धोकाही कमी झाला असून पैश्याची देखील बचत होत आहे. यामुळे हा रोबोट सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
आजच्या आधुनिक जगात अनेक ठिकाणी रोबोटचा वापर करण्यात आला आहे. नुकतेच रेल्वेच्या देखभालीसाठी रोबोटचा वापर करण्यात येणार असल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. तसेच मुंबईतील अनेक खासगी रुग्णालयात रोबोटिक शस्त्रक्रिया केल्या जातात यासोबतच आता सरकारी रुग्णालय केईएम येथेही रोबोटिक शस्त्रक्रिया सुरु होणार आहे. त्यात सार्वजनिक बांधकाम विभागातर्फेही पहिल्यांदाच तंत्रज्ञाचा वापर करत रोबोट लावण्यात आला असल्याने सध्या नवी मुंबईत हा रोबोट पाहण्यासाठी स्थानिकांनी गर्दी केली आहे.