मुंबई : विमानतळावर प्रवाशांना सुरक्षा तपासणी करण्यापूर्वी प्लास्टीक ट्रेमध्ये मोबाईल, लॅपटॉप आणि चार्जर काढून ठेवायला सांगितले जाते. परंतू लवकरच अशाप्रकारे ट्रेमध्ये आपल्या जवळील इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवण्याची काहीही गरज लागणार नाही. त्यामुळे विमानतळावरील रांगा कमी होण्यास मदतच मिळणार आहे.
विमानतळावरील सुरक्षा तपासणीसाठी भरपूर वेळ लागत असल्याने प्रवाशांना खूपच आधी विमानतळावर हजर व्हावे लागत असते. मात्र एव्हीएशन सिक्युरिटी वॉचडॉग आणि ब्यूरो ऑफ सिव्हील एव्हीएशन सिक्युरिटी (BCAS) महिनाभरात यावर निर्णय घेणार आहे. त्यामुळे विमान प्रवाशांजवळील इलेक्ट्रोनिक उपकरणांना बाजूला न ठेवता प्रवाशांची झडती घेणे शक्य होणार आहे.
अमेरिका तसेच यूरोपातील अनेक विमानतळांवर प्रवाशांना त्यांच्याजवळील मोबाईल, लॅपटॉप आणि चार्जर आदी इलेक्ट्रॉनिक उपकरणे ट्रेमध्ये बाजूला काढून ठेवण्यास सांगितले जात नाही. तसेच तेथे जॅकेट न काढताच सुरक्षा तपासणी करण्याची सोय आहे. कारण या विमानतळांवर नवे अत्याधुनिक बॅगेज स्कॅनर बसविले आहेत. आम्ही प्रवाशांना वेगाने त्यांची सुरक्षा तपासणी कशी होईल यासाठी प्रयत्न करीत असल्याचे केंद्रीय नागरिक उड्डयन मंत्रालयाने म्हटले आहे.
या नवीन बॅगेज स्कॅनर मशिन सुरूवातीला दिल्ली, मुंबई, बेंगलुरु और हैदराबाद सारख्या प्रमुख विमानतळांवर लावण्यात येतील. त्यानंतर वर्षभरात इतर विमानतळांवर या मशिन बसविण्यात येतील असे सूत्रांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून विमानप्रवाशांची संख्या वाढल्याने वाढती गर्दी पाहून हा निर्णय घेण्यात आला आहे. विमानतळांवर चेक इन आणि सिक्युरिटी चेक करताना तासनतास लागत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.