मुंबई: आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीचे (EWS) आरक्षण मराठा समाजाला लागू व्हावे, ही आमची सुरुवातीपासूनची भूमिका होती. मात्र, मराठा समाजाच्या नेत्यांना त्याला विरोध केला होता. नेत्यांच्या या भूमिकेमुळे मराठा समाजाचे (Maratah Reservation) नुकसान झाले. तेव्हा आता तरी या नेत्यांना राज्य सरकारच्या EWS आरक्षणाच्या निर्णयाचे स्वागत करावे, असे वक्तव्य ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी केले. (EWS reservation for Maratha community in Education and Jobs)
राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत EWS प्रवर्गातंर्गत आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर प्रकाश शेंडगे यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. आम्ही राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत करतो. मराठा नेत्यांना माझी विनंती आहे की, त्यांनीही राज्य सरकारच्या या निर्णायचे स्वागत करावे, असे प्रकाश शेंडगे यांनी म्हटले.
मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत EWS प्रवर्गातंर्गत आरक्षण देण्याच्या निर्णयाचे शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी स्वागत केले. वराती मागून घोडे असा निर्णय मी म्हणेन. आमची मागणी होती पण सरकारनं उशीरा निर्णय घेतला, असे विनायक मेटे यांनी सांगितले.
तत्पूर्वी मेटे यांनी काँग्रेस पक्षालाही मराठा आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले. विनायक मेटे यांनी यासंदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना पत्र लिहले आहे. या पत्रात त्यांनी काँग्रेसला आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे. मराठा समाज नितीन राऊत आणि अशोक चव्हाण यांच्या कामावर नाखुश आहे. सोनिया गांधी यांनी दलित आणि आदिवासी समाजाच्या विकासासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहतात. तसा पुढाकार मराठा समाजासाठी का घेतला जात नाही, असा सवाल विनायक मेटे यांनी या पत्रात उपस्थित केला आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे मराठा संघटनांचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. या निर्णयावर चर्चा करण्यासाठी मराठा समाजाचे समन्वयक पुण्यात एकत्र जमणार आहेत. यावेळी ते पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडणार आहेत.
सरकारने घेतलेला निर्णय म्हणजे स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखे असल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक धनंजय जाधव यांनी सांगितले आहे. तसेच, सरकारच्या या निर्णयामुळे जर कोर्टात सुनावणी सुरु असलेल्या SEBC आरक्षणासंदर्भातील याचिकेवर परिणाम झाल्यास सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही जाधव यांनी दिला.
संबंधित बातम्या:
‘EWS आरक्षण म्हणजे मराठा आरक्षण खटल्याचा खून’
मराठा समाजाला EWS आरक्षण, संघटना मात्र नाराज, पुढे काय होणार?
मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, मराठा समाजाला EWS चा लाभ, शिक्षण-नोकरीत फायदा
(EWS reservation for Maratha community in Education and Jobs)