मुंबई: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देता येईल का, याचा अभ्यास खासदार संभाजीराजे यांनी करु नये, ते नापास होतील, असा खोचक टोला ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी लगावला आहे. मराठ्यांचं ओबीसीकरण करु नये या मागणीसाठी ओबीसी-व्हीजेएनटी संघर्ष समितीकडून 3 नोव्हेंबरला राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. तर 10 नोव्हेंबरला मुंबईत ओबीसी नेत्यांची गोलमेज परिषद आयोजित करण्यात आल्याची माहिती ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिली आहे. इतकच नाही तर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनाला घेराव घालण्याचा इशाराही शेंडगे यांनी दिला आहे. (OBC leader Prakash Shendge on Sambhajiraje chatrapati and protest )
राज्य सरकारनं ‘सारथी’ संस्थेला स्वायत्त दर्जा दिला. त्याप्रमाणेत ‘महाज्योती’ या संस्थेलाही स्वायत्तता द्या, अशी मागणी ओबीसी नेत्यांकडून करण्यात येत आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देता येईल ही हरीभाऊ राठोड यांची वैयक्तिक भूमिका आहे. या भूमिकेशी ओबीसी समाज सहमत नसल्याचं शेंडगे यांनी सांगितलं. तसंच राठोड यांच्या भूमिकेवरही त्यांनी निषेध व्यक्त केला आहे.
दुसरीकडे आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज औरंगाबादेत पुन्हा एकदा रणशिंग फुंकणार आहे. 22 ऑक्टोबर रोजी धनगर समाज औरंगाबाद ते जालना अशी भव्य मानवी साखळी उभारुन सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार आहे. रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांच्या औरंगाबादेतील निवासस्थानापासून ते केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या जालन्यातील निवासस्थानापर्यंत ही मानवी साखळी असणार आहे. त्यासाठी राज्यभरातून धनगर समाजातील हजारो लोक या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती जय मल्हार सेनेचे लहुजी शेवाळी यांनी दिली आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर मराठा समाजही आक्रमक झाला आहे. तर धनगर समाजाकडूनही सातत्यानं आंदोलन करण्यात येत आहे. धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा अशी मागणी केल्या सहा दशकांपासून करण्यात येत आहे.
संबंधित बातम्या:
धनगर आरक्षण अध्यादेशाचा निर्णय घ्या, अन्यथा जनआंदोलन उभारु, प्रकाश शेंडगेंचा इशारा
आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाचा एल्गार, धनगर नेत्यांच्या नेतृत्वात आंदोलनाची हाक
OBC leader Prakash Shendge on Sambhajiraje chatrapati and protest