राज्यात सध्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण तर ओबीसी आरक्षण वाचवा अशी दोन टोकाची आंदोलने सुरु आहेत. मराठा आरक्षण गेल्या काही वर्षांपासून सुरु आहे. त्याला गेल्या वर्षी अंतरवाली सराटीतील आंदोलनानंतर चांगलीच धार आली आहे. आता लोकसभा निवडणुकीनंतर ओबीसी कार्यकर्त्यांनी, ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन सुरु केले आहे. सरकारी प्रतिनिधींनी आंदोलकांशी चर्चा केली होती. आज सरकारी शिष्टमंडळ वडीगोद्री येथे जाईल. त्यानंतर पुणे आणि मुंबईत परत येईल. ओबीसींच्या मागण्याविषयी सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते.
असा आहे दौरा
ओबीसी आंदोलकांच्या भेटीसाठी आज राज्य सरकारचं शिष्टमंडळ वडीगोद्री आणि पुणे या ठिकाणी सकाळी ११.३० वाजता पोहोचणार आहे. आधी छत्रपती संभाजीनगरला जाणार, नंतर वडी गोद्रीला शेवटी पुणे आणि मुंबई असा त्यांचा दौरा आहे. या शिष्टमंडळात छगन भूजबळ , गिरीश महाजन, अतूल सावे, उदय सामंत, धनंजय मुंडे , प्रकाश अण्णा शेंडगे आणि गोपीचंद पडळकर हे असतील. वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे उपोषण करत आहेत. तर पुण्यात मंगेश ससाणे यांचे उपोषण सुरु आहे. या सर्वांचे उपोषण सोडविण्यात येणार आहे. सकाळीच कलिना गेट नंबर आठहून हे सगळे नेते रवाना होणार आहेत.
मागण्यांवर आम्ही ठाम
काल आमचं शिष्टमंडळ आणि सरकार मध्ये सकारात्मक चर्चा झाली आहे. आज सरकारच शिष्टमंडळ येत आहे. सरकारने आमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्याचं समजत अशी माहिती मंगेश ससाणे यांनी दिली आहे. सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्यावर पुढचा निर्णय घेऊ. आज सविस्तर चर्चा होईल मग ठरवू. तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.
उपोषणावर आम्ही ठाम
आमच्या शरीरात प्राण राहिला नाही. मात्र जनतेच्या पाठबळामुळे आमचे उपोषण सुरू आहे. छगन भुजबळ आज येणार आहेत. चर्चा करून उपोषण सोडण्याबाबत विचार करू. आजचा उपोषणाचा दहावा दिवस आहे. केवळ दोन मागण्या मान्य झाल्या आहेत. अजून बऱ्याच मागण्या मान्य होणे बाकी आहे. बोगस कुणबी नोंदणी आणि सग्या सोयाऱ्यांचा अध्यादेश या मागण्या मान्य झाल्या नाहीत. या मागण्या मान्य होईपर्यंत आमचं उपोषण सुरूच असणार आहे असल्याचे हाके आणि वाघमारे यांनी सांगितले.
जरांगे विष पेरत आहेत की नाही?
हे आंदोलन शासन पुरस्कृत नाही. जरांगे विष पेरत आहेत की आणखी काही पेरत आहेत ते बघा. छगन भुजबळ यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर उपोषण मागे घ्यायचे की नाही ते ठरवू. ओबीसी उमेदवाराला मराठा समजाचे मतदान पडणार नाही अशी परिस्थिती जरांगे यांनी केली आहे. जरांगे यांची एकही गोष्ट खरी नाही. मराठा समाजाच्या पाठीत त्यांनी खंजीर खुपसला आहे. समाज भावनिक होवून जरांगे यांच्या पाठीशी गेला. भविष्यात समाज त्यांच्या पाठीशी राहणार नाही, असे नवनाथ वाघमारे म्हणाले. मराठा समाज हा मोठ्या भावाप्रमाणे राज्यात राहिला आहे. मात्र जरांगे यांनी दोन भावात भांडणे लावली आहेत. जरांगे हा चुकीचा आहे हे लवकरच मराठा समाजाला कळणार आहे, असे ते म्हणाले.