भारतात प्रत्येक सण साजरा (Festivals) करण्याची एक अनोखी पद्धत पहायला मिळते. सणांच्या दिवसांत सगळीकडे वातावरण खूप उत्साही, आनंदी असते. जन्माष्टमी किंवा गोपाळकाला (Janmashatmi) सारखा उत्सवही अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो. वेगवेगळ्या राज्यांत जन्माष्टमी वेगळ्या पद्धतीने साजरी होते. महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. विविध पक्षातील नेत्यांकडून दरवर्षी राज्यभरात दहीहंडीच्या (Dahi handi) कार्यक्रमांचे जंगी आयोजन करून शक्तिप्रदर्शन करण्यात येते. वेगवेगळ्या शहरांत मोठमोठ्या दहीहंडी उभारण्यात येतात. त्या फोडण्यासाठी अनेक पथके लांबून येत असतात. दही-हंडी फोडण्याचा हा कार्यक्रम दिसतो तितका सोपा नसतो. त्यासाठी सर्व पथके कित्येक महिन्यांपासून सराव करत असतात. एकमेकांना सांभाळत, उभे रहात, थर लावत दही-हंडी फोडण्यासाठी सर्वांचा प्रयत्न सुरू असतो. दही-हंडी फोडणाऱ्या विजेत्या पथकाला लाखो रुपयांची बक्षिसं मिळतात.
1) छबिलदास गल्ली दही-हंडी, दादर – मुंबईतील दादर येथे दही-हंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडतो. या कार्यक्रमाचे मोठ्या स्तरावर आयोजन करण्यात येते. छबिलदास गल्लीतील मानाची हंडी फोडण्यासाठी सकाळपासून धूम असते. फक्त तरुणांची नव्हे तर अनेक मुलींची पथकेही उंचावर बांधलेली ही हंडी फोडण्यासाठी अथक प्रयत्न करत असतात. ही हंडी फोडणाऱ्या पथकासाठी मोठ्या रकमेची बक्षिसे जाहीर केलेली असतात.
2) श्रमिक सार्वजनिक उत्सव मंडळ, खारघर – मुंबईतील खारघर येथील दही- हंडी उत्सव हा बहुचर्चित असतो आणि तो पाहण्यासाठी हजारो लोक सकाळपासूनच उभे असतात. श्रमिक सार्वजनिक उत्सव मंडळाद्वारे ही दही-हंडी आयोजित करण्यात येते. सर्वात उंचावर बांधलेली ही दही-हंडी फोडणे हे काही सोपे काम नाही. अनेक पथके, थरांवर थर लावत ही हंडी फोडण्याचा प्रयत्न करताना दिसतात. या हंडीसाठीही लाखो रुपयांची बक्षिसे जाहीर केले जाते.
3) दहीहंडी, ठाणे – ठाण्यातील दही-हंडीचा हा कार्यक्रम केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतातही प्रसिद्ध आहे. हा दही-हंडी उत्सव इतक्या मोठ्या प्रमाणावर आयोजित केलेले असतो की त्यासाठी मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्गज, तसेच बॉलिवूडमधील अनेक कलाकारही ही हंडी पाहण्यासाठी आवर्जून येतात. सांस्कृतिक युवा प्रतिष्ठानतर्फे या हंडीचे आयोजन करण्यात येते. दहीहंडी फोडणाऱ्या पथकासाठी तब्बल 21 लाख रुपयांचे बक्षिस ठेवले जाते.
4) दहीहंडी, मालाड – मुंबईतील मालाड येथे दही-हंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. येथे उभारलेली दहीहंडी फोडणाऱ्या पथकाला 11 लाख रुपयांचे बक्षिस देण्यात येते. गेल्या वर्षीही जन्माष्टमीच्या दिवशी, दहीहंडी फोडणाऱ्या विजेत्या पथकाला 11 लाख रुपये देण्यात होते. दही-हंडीच्या दिवशी या परिसरात एक वेगळाच उत्साह पहायला मिळतो.