मुंबई : मस्जिद स्थानकाजवळचा दीडशे वर्षांहून जुना कर्नाक ( carnac ) उड्डाण पुल गेल्या महीन्याच्या अखेरीस तब्बल 27 तासांचा ब्लाॅक घेत मध्य रेल्वेने हटविला. यापुलाला हटविल्याने कोकणातल्या ( konkan ) एलटीटी ते मडगाव एसी डबल डेकरची ( AC DOUBLE DECKER ) सीएसएमटीत थेट एण्ट्री हाेणार असल्याचे सांगितले जात होते. परंतू केवळ एक पुल तोडून काही उपयाेग नसून आणखीन तीन जुने उड्डाण पुल तोडावे लागणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
भायखळा आणि सीएसएमटी रेल्वे स्थानकांदरम्यानच्या तीन ब्रिटीशकालीन उड्डाण पुलांना हटविण्याची गरज असल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे. मध्य रेल्वेचा हा मार्ग सर्वात जुना असून येथूनच आशिया खंडातील पहिली प्रवासी रेल्वे बाेरीबंदर ते ठाणे दरम्यान 16 एप्रिल 1853 रोजी धावली होती. त्यामुळे वाढत्या शहरीकरणामुळे आधीच समुद्रसपाटीपासून खाेल असलेला हा भाग आणखी सखल झाला आहे.
मध्य रेल्वेच्या विद्युतीकरणाच्या आड आलेला हँकॉक ब्रिजलाही काही वर्षांपूर्वी अशाच प्रकारे हटवावे लागले होते. आता तीन वर्षांनंतर हँकॉक ब्रिज पालीकेच्या मदतीने बांधून पूर्ण झाला आहे. तसेच त्यावरील वाहतूकही सुरू करण्यात आली आहे.
ब्रिटीशकालीन पुलांची उंची कमी असल्याने मध्य रेल्वेवर प्रथम दाखल झालेली एसी लाेकलही चालविणे शक्य नसल्याने ती पश्चिम रेल्वेला द्यायला लागली होती. नंतर या पुलांच्या कमी उंचीची दखल घेऊन एसी लोकलचीच उंची घटवावी लागली होती.
ओव्हरहेड वायर आणि पुल तसेच ट्रेन यांचे अंतर ठराविक प्रमाणात नसल्यास ओव्हरहेड वायरचा २५ हजार के.व्हीचा व्होल्टचा करंट ट्रेनमधून पास होण्याचा धोका असतो. त्यामुळे या तिन्ही गोष्टीत विशिष्ट अंतर राखावे लागते असे मध्य रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून कल्याण दिशेने जाताना परळ स्थानकापर्यंत असलेल्या ब्रिटीशकालीन पुलांचा मध्य रेल्वेच्या विकासाला अडथळा ठरला आहे. धाेकादायक आणि अडचणीचा ठरल्याने 19-20 नोव्हेंबर रोजी पाडलेल्या कर्नाक पुलामुळे मध्य रेल्वेला पावसाळ्यात रेल्वेचे रुळ जमिनीपासून थोडे आणखी वर उचलणे शक्य हाेणार आहे. त्यामुळे पावसात पाणी तुंबून लोकल सेवा ठप्प होण्याची धोका कमी झाला आहे.
सध्या कुर्ला येथील अडगळीत असलेल्या लाेकमान्य टिळक टर्मिनसवरून काेकणात जाणारी एलटीटी एसी डबलडेकर ट्रेन सोडण्यात येते. ही डबलडेकर कोनाड्यातील एलटीटी टर्मिनस ऐवजी सीएसएमटीवरुन सोडण्याची मागणी हाेत आहे. परंतू पुलांचा अडसर असल्याने तिला सीएसएमटीला नेता येत नाही.
ही एलटीटी-मडगाव ट्रेन जेव्हा नव्याने दाखल करण्यात आली त्यावेळी एलटीटी येथे मेन्टनन्सची सुविधा नसल्याने तिला पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ येथील कारखान्यात नेण्यासाठी व्हाया वसई मार्गे वळवून येथे आणण्याचा द्राविडी प्राणायाम मध्य रेल्वेला करावा लागला होता.
मस्जिद स्थानकाजवळचा कर्नाक पूलाचा अडसर दूर झाल्याने आता डबलडेकर सीएसएमटीहून साेडणे शक्य हाेईल का असे विचारले असता मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सूतार यांनी टीव्ही नाईन मराठी वेबसाईटशी बाेलताना सांगितले की सीएसएमटीहून डबलडेकर साेडण्याची सध्या काही याेजना नाही. मात्र भायखळा ते मस्जिद स्थानकादरम्यान आणखी तीन माेठे उड्डाण पुल तोडणे गरजेचे आहे. ते ताेडल्यानंतरच त्याबाबत काही विचार करता येईल असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.
दहा पुलांचा पुनर्विकास केव्हा हाेणार …
परळ ते सीएसएमटी दरम्यान सुमारे दहा जुने ब्रिटीशकालीन पूल आहेत. त्यापैकी हँकाॅक आणि कर्नाक पुलाला आयआयटी तज्ज्ञांनी धाेकादायक ठरविल्याने आधी पाडण्यात आले. भायखळा आणि सँडहर्स्ट राेड दरम्यानच्या भायखळा ब्रिज हटवून त्याजागी 8 पदरी केबल स्टेएड ब्रिज बांधण्याची मुंबई महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट काॅर्पाेरेशनची याेजना आहे. तसेच एस ब्रिज, गार्डन ब्रिज देखील पाडण्याची गरज असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. त्यानंतरच डबलडेकर ट्रेन सीएसएमटी स्थानकातून सुटण्याचा मार्ग माेकळा हाेईल असे म्हटले जात आहे.