मुंबई : धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष हा शिंदे गटाला मिळाला आहे. त्यामुळं शिंदे गट विधिमंडळाच्या अधिवेशनात व्हीप जारी करणार आहे. ही एकप्रकारे शिंदे गटाची रणनीती राहणार आहे. यावर बोलताना आमदार सुनील राऊत म्हणाले, अधिवेशन २७ तारखेला आहे. त्यामुळं २७ तारखेपर्यंत बऱ्याच घडामोडी होतील. ज्या खोक्यांनी हा निर्णय त्यांच्या फेव्हरमध्ये घेतला त्यामध्ये बदल होईल, असा विश्वास सुनील राऊत यांनी व्यक्त केला. शिवसेना नाव किंवा मशाल चिन्ह हे पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीसाठीच वापरता येणार आहे, असंही निवडणूक आयोगाने सांगितलं.
यावर बोलताना सुनील राऊत म्हणाले,शिवसैनिकांनी कधी चिन्हाची चिंता केली नाही. आमचं चिन्ह एकचं आहे, ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. जे चिन्ह उद्धव ठाकरे देतील त्या चिन्हावर राज्यात निवडणुका लढवू. त्यातून मोठी क्रांती घडेल. राज्यात पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री बसेल, असंही राऊत यांनी म्हंटलं. ही महाराष्ट्रातील लोकांची भावना असल्याचं त्यांनी सांगितलं.
शिंदे गट सर्व शिवसेनेच्या आमदारांना येत्या अधिवेशनात व्हीप जारी करेल. असं झाल्यास ठाकरे गटाचे आमदार अडचणीत येऊ शकतात. यावर आमदार नितीन देशमुख म्हणाले, कारवाईला कोण भीत असते ज्यांची क्षमता नसते. आमच्यासाठी व्हीप फक्त उद्धव ठाकरे यांचाच. आम्ही दुसऱ्या कोणाचा व्हीप मानत नाही.
आमदाराकी हा छोटा विषय आहे. आमच्यासाठी मातोश्री महत्वाची आहे. मातोश्रीवरून बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राचे अस्तित्व निर्माण केलं. ९२-९३ च्या दंगलीत हिंदूचं संरक्षण केलं. त्या ठाकरे घराण्याचा व्हीप आम्हाला चालतो. कुण्या गद्दाराचा नाही, असं नितीन देशमुख म्हणाले.
नितीन देशमुख यांनी सांगितलं की, चिन्हाच्या मागे हा मतदार कधीचं नसतो. मतदार हा नेतृत्वाच्या मागे असतो. बाळासाहेब ठाकरे यांनी पक्ष स्थापन केला तेव्हा मशाल, त्रीशूल असं चिन्ह होतं. नंतर धनुष्यबाण घेतलं. मतदार हा बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत होता. मतदार हा चिन्हासोबत नाही, तर तो ठाकरे यांच्यासोबत असल्याचंही देशमुख म्हणाले. राज्यातला मराठी मतदार तसेच हिंदुत्व विचारसणीचा मतदार हा ठाकरे यांच्यासोबत राहील, असा विश्वासही देशमुख यांनी व्यक्त केला.