वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. हे प्रकरण महाराष्ट्रासह देशात गाजतं आहे. खेडकर कुटुंब आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे राजकीय संबंध असल्याचं बोललं जात आहे. पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान या ट्रस्टला पूजा यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी देणगी दिल्याची चर्चा आहे. तर पंकजा मुंडेंना लोकसभेची उमेदवारी मिळावी, म्हणून पूजा यांचे वडील दिलीप खेडकर यांनी पाथर्डीतील मोहटादेवीला चांदीचा मुकुट देखील अर्पण केल्याचंही बोललं जात आहे. यावर खुद्द पंकजा मुंडे यांनी भाष्य केलं आहे.
मी आता मानहानीची नोटीस पाठवून कायदेशीर मार्ग अवलंबणार आहे. माझ्याबद्दल चुकीच्या आणि बदनामीकारक बातम्या जाणीवपूर्वक चालवल्या जातात असं मला वाटतं. मला विधानपरिषद मिळाली म्हणून हे होतंय का? खेडकर यांच्या त्या कथित चेकचा एक रुपयाही माझ्या प्रतिष्ठानच्या खात्यावर आला नाही. इतके दिवस हे प्रकरण सुरू असताना आताच माझं नाव त्यामध्ये का घेण्यात आलं? कोणीतरी येतो माहिती देतो म्हणून शहानिशा करता अशा पद्धतीने बातम्या करणं योग्य नाही. माध्यमांनी विश्वासार्हता जपायला हवी. मी यावर आता कायदेशीर पाऊल उचलणार आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
मी इतकी मोठी नाहीये की एखाद्याला आयएएएस अधिकारी बनवू शकेन. मुळात मी मागची काही वर्षे कुठल्याही सविधनिक पदावर नाहीये तर मला अधिकार तरी आहेत का? खोटी डॉक्युमेंट्स काढल्याचा जो आरोप होतोय त्याची चौकशी व्हायला हवी. जर एवढ्या मोठ्या संस्थेवर आरोप होत असतील तर त्याची विश्वासार्हता धोक्यात येते. सर्व बाबींची सखोल चौकशी व्हायला हवी दोषी असेल तर कारवाई व्हायला हवी, अशी मागणीही पंकजा मुंडेंनी केली आहे.
खेडकर कुटुंबाशी माझा कसलाही सबंध नाही. जो फोटो व्हायरल केला जातोय तो मंदिरातला आहे. तिथे कोणीही येऊ शकतं. त्यावरून संबंध जोडण्याचा संबंध काय आहे? राज्यात कितीतरी असे अधिकारी नेते आहेत. जे खाजगी गाड्यांवर स्टिकर लावून फिरतात ही बाबही तपासायला हवी. मी खेडकरचे समर्थन अजिबात करणार नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.