Parbhani Somnath Suryawanshi Death Maharashtra Band : परभणीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. त्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतीची एका माथेफिरुने विटंबना केली होती. याप्रकरणी आंबेडकरी अनुयायांनी संताप व्यक्त करत परभणीत आंदोलन केले होते. यावेळी जाळपोळ आणि दगडफेकही करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतलं होतं. यात सोमनाथ सूर्यवंशी या आंदोलकाचा समावेश होता. मात्र काल परभणीमधील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशीचा कोठडीत मृत्यू झाला. याप्रकरणी आज आंबेडकरी अनुयायींकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. आंबेडकरी अनुयायींकडून महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. सध्या या महाराष्ट्र बंदचे कुठे काय पडसाद उमटतात याचा आपण आढावा घेऊया.
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी आंबेडकर अनुयायींनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. याप्रकरणी मुंबईतील चेंबूरमधील आंदोलकांना आंबेडकरी अनुयायांनी ताब्यात घेतलं आहे. महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानतंर चेंबूरमध्ये आंबेडकरी अनुयायांचे आंदोलन सुरु होते. यानंतर पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतले. तसेच दहिसरमध्ये आरपीआय आठवले पक्षातर्फे मुंबई बंदची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे दहिसरमध्ये दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. परभणीच्या घटनेबाबत आरपीआय आठवले पक्षाचे कार्यकर्ते दहिसरमध्ये रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.
परभणीतील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मृतदेहाचे छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. आज दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यावेळी बाळासाहेब आंबेडकर अंत्यविधीसाठी उपस्थित राहणार आहेत. सध्या घाटी रुग्णालयाबाहेर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या नातेवाईकांचा आक्रोश सुरू आहे. यामुळे घाटी रुग्णालयात पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाहायला मिळत आहे.
परभणीत झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी लातूर शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लातूरच्या गंजगोलाई बाजारपेठेसह औसा आणि मुरुड येथील बाजारपेठ सकाळपासूनच बंद ठेवण्यात आली आहे. तसेच एसटी बस आणि अत्यावश्यक सेवा सुरू आहेत.
परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी या आंदोलकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याची आई आणि भावाने पोलिसांवर आरोप केले आहेत. माझ्या भावाचा मृत्यू पोलीस कोठडीतील मारहाणीमुळे झाला, असा आरोप कुटुंबातने केला आहे. ज्याने मारहाण केली त्या सगळ्या पोलिसांना सस्पेंड करण्यात यावं. त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणात आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई आणि भावाने केली आहे.
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी आज परभणी बंदची हाक देण्यात आली आहे. परभणी शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे. अनेक व्यापाऱ्यांकडून कडकडीत बंद पाळला जात आहे. यामुळे परभणी शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामुळे परभणी जिल्हा पोलीस बल सहित राज्य राखीव बलाची तुकडी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आली आहे. आंबेडकर अनुयायीकडून आज परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पार्थिवावर दुपारनंतर अंत्यविधी करण्यात येणार आहे. वंचित प्रमुख प्रकाश आंबेडकर हे अंत्यविधीला उपस्थित राहणार आहेत.
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहर या घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे. आंबेडकर अनुयायी संघटनेकडून शहरातील बससेवा, शाळा, महाविद्यालये सर्व आस्थापना बंद ठेवण्यात आल्या आहेत. उमरगा येथील आंबेडकर आनुयायी संघटनेच्या वतीने प्रशासनाला निषेधांचे निवेदन देखील देण्यात येणार आहे. तर परभणी प्रकरणाचे पडसाद सोलापूरातही उमटताना दिसत आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीतील माथाडी कामगारांकडून निषेध आंदोलन करण्यात येत आहे. न्यायालयीन कोठडीत मृत झालेल्या सूर्यवंशीला न्याय द्या या मागणीसाठी आंदोलन केले जात आहे.