एवढे पैसे कुठून आले, छगन भुजबळांनी सांगितला जीवनाचा संघर्ष

| Updated on: Oct 13, 2022 | 8:08 PM

पहिले दहा-पंधरा शाखाप्रमुख झाले. त्यातला मी एक शाखा प्रमुख.

एवढे पैसे कुठून आले, छगन भुजबळांनी सांगितला जीवनाचा संघर्ष
छगन भुजबळांनी सांगितला जीवनाचा संघर्ष
Image Credit source: tv 9
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचा अमृत महोत्सवी वर्ष मुंबईत साजरा करण्यात आला. यावेळी त्यांनी आपल्या जीवनाचा संघर्ष सांगितला. भुजबळ म्हणाले, एकानं विचारलं. तुम्ही दाढी कशाला ठेवतो. उगीच तुम्ही वयस्कर वाटता. आपलं तर वयच झालेलं नाही. उगीच दाढी ठेवली. मी त्यांना सांगितलं. साहेब आज देशात, महाराष्ट्रात दाढीवाल्यांच राज्य आहे.कुठं दाढी आहे, तर कुठं पांढरी दाढी आहे. त्यामुळं मीपण ठेवली. (हास्य…)

वाढदिवसानिमित्त सगळ्यांनी कौतुक केलं. 75 वर्षांचा आयुष्याचा चित्रपट डोळ्यासमोरून जातो. दोन-चार दिवसांत विचार करायला लागलो. ज्यावेळी कळतं नव्हतं तेव्हा आईवडील दोघेही गेले. नाशिकला जन्म झाला. आईच्या मावशीनं मला माझगावला आणलं. 10 बाय 15 फुटाच्या पत्राच्या घरात ठेवलं. तिथं वीज नाही, पाणी नाही. अशा ठिकाणी लहानाचे मोठं केलं.म्युनिसीपालीटीच्या दिव्याखाली शिकलो. माझगावच्या डोंगरावर जायचो वाचायला.

भुजबळ म्हणाले, शिक्षकांनी प्रेम केलं. पुस्तक तेचं देतं. सहलीला तेच घेऊन जातं. बोलायचं कसं हेही त्यांनीच शिकविलं. ते मांडायचं कसं, त्याचे बाळकडू त्यांनीच पाजले. चांगले मार्क्स मिळाले मेरीटमध्ये आलो. एनसीसीत गेलो. वीजेटीआय कॉलेजला प्रवेश मिळाला. तिथं अभिनयात भाग घेतला. तिथंही पहील बक्षीस मिळालं.

हे सर्व करत असताना बाळासाहेब ठाकरेंची सभा शिवाजी पार्कवर झाली. तेव्हा मी कॉलेजमध्ये सेक्रेटरी होतो. बाळासाहेब ठाकरे हे मराठी माणसासाठी लढतात. चला आपण जाऊया. म्हणून शिवाजी पार्कला गेलो. तिथं बसलो. सभेला प्रबोधनकार ठाकरे होते. रामराव आदिक होते. त्यावेळचे बाळ ठाकरे होते. घरी आल्यावर माझगावचे लोकं आले. ते म्हणाले भुजबळ तुम्ही शाखा प्रमुख व्हा. पहिले दहा-पंधरा शाखाप्रमुख झाले. त्यातला मी एक शाखा प्रमुख.

शिवसेनेच काम सुरू झालं. बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद. तीन-तीन वाजेपर्यंत चुन्यानं भिंती रंगवायचो. 1973 साली छगन भुजबळ यांना निवडून द्या. असं सांगत मी निवडून आलो. पैसे काहीचं नव्हते. शिवसैनिक म्हणून लोकांनी निवडलं.

मोठा भाऊ होता. खूप कष्ट केलं. सकाळी तीन वाजता मार्केटमध्ये जायचो. भाजीपाला आणायचा. माझगावच्या घराच्या समोर फुटपाथवर विकायचा. चार-पाच किलोमीटरचं अंतर कापावं लागायचं. टांग्याच्या पाठीमागे लटकायचो. पण, लक्षात आल्यावर टांग्यावाला चाबूक मारायचा. खूप कष्ट केले, असं भुजबळ यांनी सांगितलं.

भाजीपाल्याचा धंदा वाढत गेला. इकडं शिक्षण सुरू होतं. भाऊ सकाळी तीन वाजता जायचा. मी सकाळी पाच वाजता जायचो. मोठ्या मोठ्या कंपन्याचे कंत्राट घेतले. आणि ट्रक लोड भाजी पाठवायचो रोज. एवढी संपत्ती कुठून आली. म्हणून लोकं विचारतात. लहानपणापासून कष्ट करतोय.

बंद पडलेली कंपनी चालविली. जीएसटीचे टायर रिमोल्डिंगमध्ये माझ्याकडं यायचे. कसे आले पैसे. मुंबई-गोवा ही पहिली भवानी ट्रव्हल्स ही छगन भुजबळनं सुरू केली. सीनेमाही काढले. अनेक उद्योग सुरू होते. त्यातून पैसे कमविले, अशी स्पष्टोक्ती छगन भुजबळ यांनी दिली.