डॉ. पायल तडवी आत्महत्या : आतापर्यंत काय काय झालं?

| Updated on: May 29, 2019 | 3:39 PM

मुंबई : रॅगिंगमुळे आत्महत्या केलेल्या डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. पसार असलेल्या 3 महिला डॉक्टरांनी मार्डला पत्र लिहून आम्हाला बाजू मांडण्याची संधी द्यावी, तसंच महाविद्यालयाकडून निष्पक्ष तपासणी व्हावी अशी मागणी केली आहे. पायलला रॅगिंग करुन आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या या तीन डॉक्टरांचं निलंबन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडंट डॉक्टर्स अर्थात […]

डॉ. पायल तडवी आत्महत्या : आतापर्यंत काय काय झालं?
Follow us on

मुंबई : रॅगिंगमुळे आत्महत्या केलेल्या डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. पसार असलेल्या 3 महिला डॉक्टरांनी मार्डला पत्र लिहून आम्हाला बाजू मांडण्याची संधी द्यावी, तसंच महाविद्यालयाकडून निष्पक्ष तपासणी व्हावी अशी मागणी केली आहे. पायलला रॅगिंग करुन आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या या तीन डॉक्टरांचं निलंबन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडंट डॉक्टर्स अर्थात मार्डनं या तिघींनाही निलंबित केलं. डॉ.पायल तडवीचे व्हॉट्सअप चॅट टीव्ही 9 मराठीच्या हाती लागलं आहे. या व्हॉट्सॅप चॅटमध्ये पायलला छळणाऱ्या डॉक्टरांच्या नावाचा उल्लेख दिसून येत आहे.

रॅगिंगमुळे आत्महत्या

मुंबईतील नायर वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या डॉक्टर तरुणीने 22 मे रोजी आत्महत्या केली. पायल तडवी असं या विद्यार्थीनीचे नाव आहे. पायलवर वरिष्ठ डॉक्टर सतत मानसिक छळ करत असल्याचा आरोप आहे. या छळाला कंटाळून पायलने  गळफास घेत आत्महत्या केली. पायलला सतत ती आदिवासी असल्याने हिणवलं जात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. पायल मूळची जळगावची रहिवासी होती. आदिवासी समाजातील पायल ताडवी एका गरीब घरातून वैद्कीय शिक्षणासाठी मुंबईत आली होती. नुकतेच तिचे लग्नही झाले होते. पण ही सर्व स्वप्न आता एका क्षणात उद्धवस्त झाली आहेत. कारण पायलने नायर रुग्णालयात गळफास घेत आत्महत्या केली.

डॉ. पायल तडवीच्या आत्महत्येपूर्वीचं व्हॉट्सअॅप चॅट टीव्ही 9 च्या हाती  

आदिवासी असणं हा पायलसाठी अभिशाप ठरला. कारण तिला राखीव कोट्यातून वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळाला होता. यामुळे नायर रुग्णालयातील तीन वरिष्ठ डॉक्टरकडून तिचा वारंवार मानसिक छळ केला जात होता. कँटीनमध्ये तिच्यावर कमेंट करणं, व्हाट्सअॅप ग्रुपवर तिला वाईट वाटेल, असे मेसेज करणे, असा प्रकार तीन महिला सिनिअर डॉक्टर्सकडून करण्यात येत होता. या सगळ्याला कंटाळून पायलने नायर वैदयकीय महाविद्यालयाच्या होस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

रॅगिंग करणाऱ्या महिला डॉक्टर पसार

आग्रीपाडा पोलिसांनी डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती महीरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या तीन महिला डॉक्टरांविरुद्ध अॅट्रोसिटीबरोबर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या तीनही डॉक्टर पसार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

नायर रुग्णालयामध्ये रॅगिंग विरोधी समितीची बैठक

नायर रुग्णालयातील डॉक्टरांनी केलेल्या रॅगिंगच्या जाचाला कंटाळून  पायल तडवी या प्रशिक्षणार्थी डॉक्टरने आत्महत्या केल्याच्या प्रकरणाची गंभीर दखल घेत शनिवारी नायर रुग्णालयामध्ये रॅगिंग विरोधी समितीची बैठक घेण्यात आली. ती बैठक आठ तास चालली. चौकशीनंतर प्रसुती विभागातील डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल तिन्ही डॉक्टर फरार असल्याने त्यांचा जबाब नोंदविण्यात आलेला नाही. त्यांच्यावर रॅगिंगचा आरोप आहे.

संबंधित अहवाल काल सोमवारी जाहीर करण्यात येणार आसल्याची माहिती मार्डकडून देण्यात आली. बैठकीमध्ये रुग्णालयातील विद्यार्थी डॉक्टर, वैद्यकीय तज्ज्ञ, कर्मचारी, परिचारिका तसेच विभागप्रमुखांसह समितीमधील विद्यार्थी डॉक्टर प्रतिनिधींचा समावेश होता. त्यांचा जबाब नोंदविण्यात आला आहे. हा अहवाल सोमवारी वैद्यकीय संचालनालय, एमसीआय, एमयूएचएस यांच्याकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती मार्डकडून देण्यात आली. डॉक्टरांसाठी हेल्पलाइन क्रमांक, समुपदेशन कक्ष सुरू करण्याचे विचाराधीन आहे.

महिला आयोगाकडून दखल

रॅगिंगला कंटाळून डॉ. पायल तडवी यांनी केलेल्या आत्महतेच्या घटनेची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने स्वाधिकारे गंभीर दखल घेतली. महिला आयोगाने मुंबईतील नायर रूग्णालयाच्या अधिष्ठातांना नोटीस बजावली.कारवाई करण्याबरोबरच रॅगिंगविरोधी कायद्याच्या अंमलबजावणीचा तपशीलही आयोगाने मागितला आहे.

विद्यार्थ्यांचा मोर्चा

डॉ. पायल तडवी यांच्या आत्महत्येप्रकरणी शनिवारी भारतीय विद्यार्थी मोर्चा तसेच राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती या संघटनांद्वारे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. आर. एन. भारमळ यांस निवेदन देण्यात आले. या निवेदनात संबंधित तीन आरोपींवर कडक कारवाई करून त्यांचे अडमिशन रद्द करावे आणि त्यांची MBBS डिग्रीचा परवाना रद्द करावी अशी मागणी केली.

त्याचबरोबर स्त्रीरोगतज्ज्ञ विभागाच्या प्रमुख डॉ.शिरोडकर आणि डॉ. चिंगलिंग यांच्यावर सुद्धा कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली.

जळगावात निवेदने 

अनुसूचित जमाती प्रवर्गातील असल्याने होत असलेल्या छळाला कंटाळून डॉ. पायल तडवी यांनी आत्महत्या केली. याप्रकरणी तीन महिला डॉक्टरांवर गुन्हा नोंदविण्यात आला. त्यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट अंतर्गत कारवाई व्हावी, तसेच रुग्णालयाच्या प्रबंधन समितीवर कारवाई व्हावी, असे निवेदन आज विविध आदिवासी संघटनांनी जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

एका डॉक्टरला अटक

डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणी तीनपैकी एका डॉक्टरला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी डॉ. भक्ती मेहर हिला पोलिसांनी अटक केली असून सध्या ती पोलिसांच्या ताब्यात आहे. मात्र अद्याप डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या दोघीही फरार आहेत. सध्या पोलिस या दोघींचा शोध घेत आहेत. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगानेही दखल घेतली आहे.

आतापर्यंत काय काय झालं?

 22 मे – रॅगिंगमुळे डॉ. पायल तडवीची आत्महत्या

22 मे –  रॅगिंग करणाऱ्या महिला डॉक्टर पसार – डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती महीरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल

25 मे – नायर रुग्णालयामध्ये रॅगिंग विरोधी समितीची बैठक

25 मे – विद्यार्थ्यांचं आंदोलन, दोषींना शिक्षेची मागणी  

26 – पायलचं व्हॉट्सअप चॅट समोर

27 मे – महिला आयोगाकडून दखल

27 मे – आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन डॉक्टरांचे निलंबन, मार्डची कारवाई

27 मे – पायलच्या मूळगावी जळगावात निवेदने 

28 मे – पायलच्या कुटुंबीयांचं नायर रुग्णालयाबाहेर आंदोलन

28 मे – वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन कुटुंबीयांच्या भेटीला

28 मे – तीनपैकी एका डॉक्टरला अटक, डॉ. भक्ती मेहरला पोलिसांकडून अटक

28 मे – प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल

29 मे – आणखी दोन डॉक्टरांना पोलिसांकडून अटक

29 मे – डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या दोघींना मध्यरात्री अटक

29 मे – तिघींना कोर्टात हजर केलं  जाणार

29 मे- सकाळी तिन्ही आरोपी सत्र न्यायलयात हजर

29 मे – पायलच्या मृतदेहावर मारहाणीचे व्रण, कुटुंबियांचा धक्कादायक आरोप

29 मे – पायलच्या मृतदेहाचं पुन्हा एकदा शवविच्छेदन करण्याची वकील नितीन सातपुतेंची मागणी

29 मे – पायलच्या आत्महत्येप्रकरणी तिन्ही आरोपी डॉक्टरांना 31 मेपर्यंत पोलीस कोठडी

 

संबंधित बातमी 

रॅगिंगला कंटाळून डॉक्टर तरुणीची नायर रुग्णालयात आत्महत्या   

डॉ. पायल तडवीच्या आत्महत्येपूर्वीचं व्हॉट्सअॅप चॅट टीव्ही 9 च्या हाती