मुंबई : दरवर्षी पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांची अक्षरश: चाळण झालेली पाहायला मिळते. त्यामुळे मुंबईत खड्डे की खड्ड्यात मुंबई (Mumbai Potholes) असा प्रश्न पावसाळ्यात सर्वसामान्य मुंबईकरांना पडतो. यंदा मुंबईतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांपैकी 90 टक्के खड्डे बुजवल्याचा दावा पालिकेने (Mumbai BMC) केला आहे. 2018-19 या वर्षात 4898 खड्डे भरण्यासाठी पालिकेने 7 कोटी 98 लाख 7 रुपये खर्च केले आहेत. यानुसार प्रति खड्डा भरण्यासाठी पालिकेला 17 हजार 693 रुपये खर्च आल्याची माहिती माहिती अधिकार कायद्यान्वे उघडकीस आली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षी मुंबईतील खड्डे भरण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात. यात खूप मोठा भ्रष्टाचार होतो. यंदाच्या पावसाळ्यात म्हणजेच 10 जून ते 1 ऑगस्ट या दरम्यान 2 हजार 648 खड्ड्यांपैकी 2 हजार 334 खड्डे भरले आहेत. त्यामुळे सध्या मुंबईत केवळ 414 खड्डे शिल्लक आहेत. असा अजब दावा पालिकेने केला होता. पण पालिकेचा हा दावा खोटा असल्याचे सिद्ध झालं आहे.
कारण शेख यांना आरटीआयद्वारे मिळालेल्या माहितीनुसार यंदा 1 एप्रिल 2019 ते 31 जुलै 2019 पर्यंत खड्ड्यांच्या संदर्भात एकूण 2 हजार 661 तक्रारी ऑनलाईन प्राप्त झाल्या होत्या. त्यातील 2 हजार 462 खड्डे भरण्यात आले असून सध्या केवळ 199 खड्डे शिल्लक आहेत.
आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी 2014 पासून मुंबई रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याबाबतची माहिती पालिकेकडे मगावली होती. सहाय्यक अभियंता व माहिती अधिकारी य. प. जुन्नरकर यांनी शेख यांना दिलेल्या माहितीनुसार 2013 पासून 31 जुलै 2019 पर्यंत मुंबईतील खड्ड्यांच्या 24 हजार 146 तक्रारी ऑनलाईन दाखल झाल्या. त्यातील 23 हजार 388 खड्डे भरण्यात आले असेही यात म्हटलं आहे.
वर्षानुसार प्राप्त झालेल्या ऑनलाईन तक्रारी
एप्रिल 2013 ते मार्च 2014 या कालावधीत एकूण 2300 खड्डे रस्त्यावर पडल्याचा तक्रारी दाखल झाल्यात. त्यातील 1556 खड्डे अद्याप भरण्यात आलेले असून 35 खड्डे भरायचे बाकी आहेत. त्यानंतर 2014 ते 2015 या काळात एकूण 2093 खड्ड्यांच्या तक्रारींची नोंद पालिकेकडे करण्यात आली. यावर्षात मिळालेल्या माहितीपेक्षा 5 खड्डे पालिकेने जास्त भरले आहे. म्हणजेच या वर्षात 2098 खड्डे भरले आहेत.
तर एप्रिल 2015 ते 31 मार्च 2016 या कालावधीत एकूण 1593 खड्डे भरल्याच्या तक्रारी आल्या आणि 1583 खड्डे भरले गेले, केवळ 15 खड्डे भरायचे बाकी आहेत.
त्याशिवाय एप्रिल 2016 ते 31 मार्च 2017 पर्यंत एकूण 6544 खड्डे भरल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आणि 6098 खड्डे भरले गेले, केवळ 446 खड्डे शिल्लक आहेत. एप्रिल 2017 ते 31 मार्च 2018 पर्यंत एकूण 4045 खड्डे प्राप्त झाले आणि 3981 खड्डे भरले गेले, केवळ 64 खड्डे भरले गेले.
तसेच एप्रिल 2018 ते 31 मार्च 2019 पर्यंत एकूण 4910 खड्डे प्राप्त झाले आणि 4898 खड्डे भरले गेले, केवळ 12 खड्डे भरायचे राहिले. एप्रिल 2019 ते 31 जुलै 2019 पर्यंत एकूण 2661 खड्डे प्राप्त झाले आणि 2462खड्डे भरले गेले, केवळ 199खड्डे भरायचे बाकी आहेत.
दरम्यान 2013 ते 2019 या कालावधीत मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी एकूण 175 कोटी 51 लाख 86 हजार रुपयांची तरतूद करण्यत आली होती. यात 113 कोटी 84 लाख 77 हजार रुपये आतापर्यंत खर्च झाले आहेत.
अंदाजे अंदाजपत्रक आणि वर्षानुसार खर्च!
एप्रिल 2013 ते 31 मार्च 2014 या कालावधीत 50 कोटी रुपयांची अंदाजे तरतूद करण्यात आली. त्यातील 46 कोटी 25 लाख 97 हजार रुपये खर्च झाले. तर एप्रिल 2014 ते 31 मार्च 2015 पर्यंत या वर्षात 39 कोटी 24 लाख 26 हजार रुपयांचा बजेट देण्यात आला. त्यातील 34 कोटी 16 लाख 92 हजार रुपये खर्च करण्यात आले.
एप्रिल 2015 ते 31 मार्च 2016 पर्यंत या कालावधीत अंदाजे बजेट 35 कोटी इतका होता. त्यातील केवळ 10 कोटी 61 लाख 27 हजार रुपये खर्च झाले. एप्रिल 2016 ते 31 मार्च 2017 या कालावधीत अंदाजे 9 कोटी 5 लाख 86 हजार रुपये बजेट होता. त्यातील 6 कोटी 94 लाख 97 हजार रुपये हे खड्डे बुजवण्यासाठी वापरण्यात आले.
त्याशिवाय एप्रिल 2017 ते 31 मार्च 2018 पर्यंत अंदाजे 10 कोटी 50 लाख बजेट होता. त्यातील 7 कोटी 73 लाख 22 हजार रुपये खर्च करण्यात आले. तर एप्रिल 2018 ते 31 मार्च 2019 पर्यंत अंदाजे 11 कोटी 70 लाख बजेट होता. त्यातील 7 कोटी 98 लाख 7 हजार रुपये खर्च झाले आहेत.
तर यंदाच्या वर्षी म्हणजेच एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 पर्यंत अंदाजे 40 कोटींचा बजेट देण्यात आला आहे. त्यातील आतापर्यत 14 लाख 35 हजार रुपये खर्च झाले आहे.
या आकडेवारीनुसार 2017-2018 मध्ये 3981 खड्डे भरण्यासाठी 7 कोटी 73 लाख 22 रुपये खर्च झाले आहेत. तर 2018-2019 मध्ये 4898 खड्डे भरण्यासाठी 7 कोटी 98 लाख 7 रुपये खर्च झाले आहेत. त्यानुसार खड्डा भरण्यासाठी 17 हजार 693 रुपये खर्च करण्यात आले आहेत अशी धक्कादायक माहिती यावेळी उघडकीस आली आहे.
संबंधित बातम्या :