Phone Tapping : रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाई होणार?, मुख्य सचिवांकडून मुख्यमंत्र्यांकडे अहवाल सादर

| Updated on: Mar 25, 2021 | 9:24 PM

रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाई करण्याबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळतेय. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आज महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री उपस्थित होते.

Phone Tapping : रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाई होणार?, मुख्य सचिवांकडून मुख्यमंत्र्यांकडे अहवाल सादर
रश्मी शुक्ला
Follow us on

मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणात आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण रश्मी शुक्ला यांच्याबाबतचा फोन टॅपिंग प्रकरणाचा अहवाल मुख्य सचिवांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर केला आहे. त्याचबरोबर रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाई करण्याबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळतेय. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आज महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री उपस्थित होते.(Decision to take action against IPS officer Rashmi Shukla, report submitted by Chief Secretary to CM)

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फोन टॅपिंग, पोलिसातल्या बढती संदर्भातील रॅकेट, परमबीर सिंग यांचे आरोप आणि सिंग यांनी दाखल केलेल्या याचिकेवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक, एकनाथ शिंदे आणि अनिल परबही उपस्थित होते.

रश्मी शुक्लांच्या बचावासाठी भाजप मैदानात

IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या बचावासाठी आता भाजपचे नेते मैदानात उतरले आहेत. राज्य सरकार चौकशीची भाषा करुन रश्मी शुक्ला यांच्यावर दबाव निर्माण करु पाहत आहे, असा आरोप भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी केला. सरकार चौकशीची इतकी घाई का करत आहे? सरकारने प्रथम पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटची चौकशी करावी. त्या चौकशीत रश्मी शुक्ला यांची चूक असेल तर ती समोर येईल, असे प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

प्रवीण दरेकर यांनी रश्मी शुक्ला यांची अप्रत्यक्षपणे पाठराखण केली. रश्मी शुक्ला यांनी अपक्ष आमदार राजेंद्र यड्रावकर यांना धमकावल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. मात्र, मला आव्हाडांचं वक्तव्य म्हणजे राजेंद्र यड्रावकर यांचे अवमूल्यन वाटते. कुठलाही आमदार नेता अशाप्रकारे दबावाला बळी पडत नसतो. एवढा कमकुवत लोकप्रतिनिधी नसतो. त्यामुळे जितेंद्र आव्हाडांच्या बोलण्यात तथ्य वाटत नाही, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले.

जितेंद्र आव्हाडांची रश्मी शुक्लांवर टीका

जितेंद्र आव्हाड यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. रश्मी शुक्ला आपल्यावर कारवाई होऊ म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासमोर रडल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. तसेच आघाडी सरकारने देखील मन मोठं करुन तेव्हा त्यांना माफ केल्याचं सांगितलं. मात्र, त्या काही दिवसांनी बदनामीचं षडयंत्र रचतील हे माहिती नसल्याचंही आव्हाड म्हणाले. ते मुंबईत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते.

फोन टॅपिंग प्रकरण विरोधकांवरच बुमरँग होणार?

राज्यातील काही मंत्र्यांचे फोन टॅप करुन मिळालेल्या माहितीच्याआधारे भाजपने ठाकरे सरकारविरोधात आरोपांची राळ उडवून दिली आहे. भाजपच्या या आक्रमक पवित्र्यामुळे सुरुवातीला बचावात्मक पवित्रा घेणारे महाविकासआघाडीचे नेते आता डॅमेज कंट्रोलसाठी पुढे सरसावले आहेत. फोन टॅपिंग प्रकरणाच्या सूत्रधार असलेल्या पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाई करण्याची तयारी ठाकरे सरकारने सुरु केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकासआघाडीच्या महत्त्वाच्या मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना फोन टॅपिंग प्रकरणाचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता हे प्रकरण विरोधकांवरच बुमरँग होणार, अशी चर्चा सुरु झाली आहे.

संबंधित बातम्या :

Jitendra Awhad on Rashmi Shukla : आयपीएस रश्मी शुक्ला का रडल्या? जितेंद्र आव्हाड म्हणतात…

रश्मी शुक्ला भाजपच्या एजंट, बेकायदेशीरपणे विरोधकांचे फोन टॅप करायच्या; राष्ट्रवादी काँग्रेसचा पलटवार

Decision to take action against IPS officer Rashmi Shukla, report submitted by Chief Secretary to CM