मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज मुंबई दौरा आहे. मोदी मुंबईत विविध विकासकामांचं लोकार्पण करणार आहेत. मोदी यांच्या या दौऱ्याची भाजप आणि शिंदे गटाने जय्यत तयारी केली आहे. तब्बल दीड लाख लोक या मोर्चाला येणार असल्याची चर्चा आहे. या मोर्चाच्या निमित्ताने संपूर्ण मुंबई शहर बॅनर्स, होर्डिंग्ज, पोस्टर्स आणि कटआऊटने भरून गेलं आहे. मोक्याच्या ठिकाणी ही होर्डिंगबाजी करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईचं वातावरण मोदीमय झालं आहे. मात्र, यात कुणी तरी मिठाचा खडा टाकला आहे. मोदींचं एक बॅनर्स दक्षिण मुंबईत झळकवण्यात आलं आहे. त्यातून मोदी आणि भाजपला खोचक टोला लगावण्यात आला आहे.
दक्षिण मुंबईतील गिरगाव आणि मरीन लाइन्स येथे ही बॅनर्स लावण्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील आगमनापूर्वीच ही बॅनर्स लावण्यात आली आहेत. बाळासाहेबांपुढे मोदींची मान झुकते, अशा आशयाचं हे बॅनर्स झळकवण्यात आलं आहे. त्यामुळे या बॅनर्सची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.
या बॅनर्सवर कोणताही मजकूर लिहिलेला नाही. तसेच या बॅनर्सवर फक्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे. बाळासाहेब ह्यात असताना मोदी मातोश्रीवर आले होते.
त्यावेळी त्यांनी मान झुकवून बाळासाहेबांशी हस्तांदोलन केलं होतं. तोच फोटो या बॅनर्सवर लावण्यात आला आहे. त्यावर काही लिहिलेलं नसलं तरी भाजपला जे सुनवायचंय ते सुनावण्यात आलं आहे.
हे बॅनर्स कोणी लावले त्याची माहिती नाही. बॅनर्सवर कुणाचंही नाव नाही. कोणत्याही पक्षाचं नाव नाही. कोणत्याही संघटनेचं नाव नाही. अज्ञात व्यक्तीने हे बॅनर्स लावलं आहे. व्यक्ती अज्ञात असला तरी भाजपला डिवचण्यासाठीच हे बॅनर्स लावण्यात आल्याचीही चर्चा रंगली आहे. मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर या बॅनर्सची जोरदार चर्चा रंगली आहे.
सध्या मुंबईत शिंदेगट, भाजप आणि ठाकरे गटात प्रचंड बॅनरबाजी सुरू आहे. एकमेकांना बॅनर्सवरून डिवचले जात आहे. त्यातच आता या बॅनर्सची भर पडल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांचेही मोठे कटआऊट्स लावले आहेत. त्यावरून ठाकरे गटाने शिंदे गटावर टीका केली आहे. बाळासाहेबांच्या कटआऊट्सपेक्षा भाजपच्या नेत्यांचे कटआऊट्स मोठे आहेत, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.