मुंबई: शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बसच्या अपघातानंतर धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. गियरऐवजी या स्कूलबसमध्ये लाकडी दांडा लावल्याचं समोर आलं आहे. संताक्रुझमधील पोदार शाळेच्या स्कूलबसमधील हा धक्कादायक प्रकार आहे.
या स्कूलबसच्या गियरच्या जागी चक्क बांबू लावून बस चालवली जात होती. काल संध्याकाळी ही बस खारमध्ये विद्यार्थ्यांना सोडत असताना, एका बीएमडब्ल्यू कारला धडकली. यावेळी बस विद्यार्थ्यांनी खचाखच भरली होती. या अपघातानंतर कारचालकाची स्कूलबसच्या ड्रायव्हरशी बाचाबाची झाली. त्यावेळी या कारचालकाने स्कूलबसमधील हा सर्व प्रकार पाहिला.
याबाबत स्कूलबस ड्रायव्हरला जाब विचारला असता, त्याने बस घेऊन पळ काढला. मात्र कारचालकाने या बसचा पाठलाग करुन ही बस थांबवली आणि पोलिसांना बोलावलं . पोलिसांनी हा प्रकार पाहून बस चालकविरोधात हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.
स्कूलबस चालकांचा हलगर्जीपणा अनेकदा विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र गियरऐवजी लाकडी दांडक्याने बस चालवली जात असली, तर त्याला काय म्हणावं?