गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस भरतीची चर्चा रंगली होती. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे भरती प्रक्रियेला विलंब झाला. आता विधानसभा निवडणुकीचे पण लवकरच पडघम वाजतील. राज्य सरकारने भरती प्रक्रिया पावसाळ्याच्या तोंडावर सुरु केली. पावसाने अनेक जिल्ह्यात हजेरी लावली. त्यामुळे मैदानावर चिखल झाला. जिथे पाऊस पडला तिथे पोलीस भरती प्रक्रियेला ब्रेक लागला.
काय म्हणाले फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व स्थितीचा आढावा घेत पोलीस भरतीविषयी भाष्य केले आहे.राज्यात ज्या ज्या ठिकाणी पाऊस आहे. तिथे चाचणी पुढे ढकलण्यात आली आहे. पाऊस पुढे वाढणार आहे, आचारसंहिता लागेल. त्यामुळे चाचणी पुढे गेली तर मुलांचे वय निघून जाईल. सेकंड चान्स मिळत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ज्या ठिकाणी पाऊस आहे, तिथे चाचण्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तर ज्या ठिकाणी पाऊस नाही, तिथे चाचण्या सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली. अनेक ठिकाणी मुलांची भाऊगर्दी उसळली आहे, अशी ठिकाणी व्यवस्था करण्यात सांगण्यात आले आहे. मंगलकार्याल अथवा योग्य ठिकाणी अशी व्यवस्था करण्यास सांगण्यात आल्याचे ते म्हणाले.
पोलिसांच्या संकेतस्थळावर माहिती
नांदेड पोलीस दलातील कर्मचार्यांची भरती प्रक्रिया 19 जूनपासून सुरू झाली. 134 जागेसाठी 15 हजार 200 अर्ज आले आहेत. आज मैदानी चाचणी होणार होती परंतु पाऊस पडल्यामुळे ही चाचणी पुढे ढकलन्यात आली आहे. आज ज्याची चाचणी होती त्यांना पुढील तारीख देण्यात येणार आहे. या विषयीची सर्व माहिती ही नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या संकेतस्थळावर टाकण्यात येणार आहे.
भरतीसाठी लाखो उमेदवार
राज्यात 19 जूनपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरु झाली. एकूण 17 हजार 471 जागांसाठी 17 लाख 76 हजार 256 अर्ज आले आहेत. बँड्समन पदाच्या 41 जागा, तुरुंग विभागात शिपाई पदाची जागा, चालक पदाच्या 1686 जागा, पोलीस शिपाई पदाच्या 9595 जागा तर शीघ्र कृती दलासाठी 4 हजार 349 जागांसाठी राज्यातील परीक्षार्थ्यांनी कंबर कसली आहे. त्यात अनेक ठिकाणी पावसामुळे भरती प्रक्रिया पुढे ढकलावी लागली आहे.