मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी महाराष्ट्रातील काँग्रेसमुळे (congress) कोरोना पसरल्याचं विधान संसदेत केलं होतं. या विधानाचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने राज्यभरात भाजपच्या कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन सुरू केलं आहे. आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी काँग्रेस जोरदार निदर्शने करणार आहे. पण त्यापूर्वीच काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे (atul londhe) यांनी एकट्यानेच सागर निवासस्थानी गेले आणि त्यांनी सागर बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. तेव्हा महाराष्ट्र द्रोही बीजेपीचा निषेध असो, अशा घोषणा लोंढे यांनी दिल्या. त्यावेळी अरे या, गाडी घे ना असं म्हणत पोलिसांनी लोंढेंच्या खरोखरच मुसक्या आवळल्या. लोंढेंचे दोन्ही हात पाठी पकडून पोलिसांनी त्यांच्या तोंडावर हात ठेवला होता. त्या अवस्थेतही लोंढे घोषणा देत होते. अखेर पोलिसांनी त्यांना गाडीत बसवलं आणि पोलीस स्टेशनकडे नेले.
देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी आंदोलन करणार असल्याचा इशारा कालच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला होता. त्यामुळे फडणवीसांच्या बंगल्याबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळी 11 वाजता हे आंदोलन असल्याने भाजपचे कार्यकर्तेही सागर बंगल्याबाहेर जमले आहेत. भाजप नेते प्रसाद लाड, कृपाशंकर सिंह, मंगलप्रभात लोढा आणि आशिष शेलार यांच्यासह भाजपचे अनेक नेते फडणवीसांच्या बंगल्याबाहेर ढाल बनून उभे आहेत. तर सागर बंगल्यात येणाऱ्यांना त्यांचं ओळखपत्रं पाहून सोडलं जात आहे. या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असतानाच काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सागरमध्ये शिरण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. सागर बंगल्यात जाण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या.
पोलिसांनी लोंढे यांचे हात तोंड दाबून, पाठीमागून धरत अक्षरशः ओढत गाडीत बसवलं. पोलिसांनी तोंड दाबलेले असतानाही लोंढे यांची घोषणाबाजी सुरू होती. महाराष्ट्र द्रोही भाजपचा निषेध असो अशा घोषणा लोंढे बेंबीच्या देठापासून देत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान भाजपनं केल्याची टीका त्यांनी यावेळी केली आहे. दोन पोलिसांनी लोंढे यांना अक्षरशः फरफटतच गाडीत बसवलं. मात्र अशाही परिस्थितीत लोंढे हे महाराष्ट्राद्वेष्ट्या भाजप सरकारचा निषेध असो, अशा घोषणा देताना दिसलेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून याआधीच काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. काँग्रेसकडून सध्या निषेध आंदोलन सुरु आहेत. यात काल प्रसाद लाड यांनी नाना पटोलेंचा एकेरी उल्लेख केल्यानं वाद पेटलाय. त्या पार्श्वभूमीवर आज पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला असून सागर बंगला आणि लक्ष्मी निवासस्थानीही मोठा पोलिस फौजफाटा सकाळपासूनच तैनात करण्यात आलाय.
यावेळी अतुल लोंढे यांनी टीव्ही 9 मराठीवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. हा महाराष्ट्र कोरोनाची झुंजत होता, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी मोराला दाणे खाऊ घालत होते. महाराष्ट्राच्या जनतेनं मजुरांना मदत केली आहे. यूपीची इलेक्शन जिंकण्यासाठी महाराष्ट्राला बदनाम करता. फक्त निवडणुकीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचंआणि पदोपदी महाराष्ट्राचा अपमान करायचा ही मोदींची निती आहे. आम्ही सनदशीर मार्गाने आंदोलन करणार असल्याचं स्पष्ट केलं. पण प्रसाद लाड यांनी अतिशय अर्वाच्च्य भाषेत आम्हाला आव्हान दिलं. त्यावर कारवाई केलीच पाहिजे, असं अतुल लोंढे म्हणाले.
संबंधित बातम्या:
भाजपचे साडेतीन लोक तुरुंगात जातील, आय रिपीट, जे उखडायचे ते उखडा; संजय राऊतांचा मोठा दावा
जगप्रसिद्ध वेरूळ लेणींजवळील जैन कीर्तिस्तंभ हटवणार नाहीत, केंद्रीय मंत्र्यांची ग्वाही, काय आहे वाद?