मुंबई : मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब (Ajmal Kasab) याला जिवंत पकडणारे राष्ट्रपती पदक विजेते पोलिस अधिकारी संजय गोविलकर (Sanjay Govilkar) यांना निलंबित करण्यात आलं आहे. दाऊदचा हस्तक सोहैल भामला (Sohail Bhamla) याला मुंबई विमानतळावरुन जाऊ दिल्याप्रकरणी गोविलकरांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
आर्थिक गुन्हे शाखेत असलेल्या या संजय गोविलकर यांच्यासह सहाय्यक पोलिस निरीक्षक जितेंद्र शिंगोटे यांनाही निलंबित करण्यात आलं आहे. दुबईहून मुंबईत दाखल झाल्यानंतर भामला याला विमानतळावर ताब्यात घेण्यात आलं होतं. मात्र गेल्या आठवड्यात चौकशी केल्यानंतर भामलाला विमानतळावरुन सोडण्यात आलं. पोलिस आयुक्त संजय बर्वे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत निलंबनाची कारवाई केली.
भामला हा गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई पोलिसांच्या ‘वाँटेड’ यादीत होता. भामला मुंबईत दाखल झाल्याची माहिती मुंबई विमानतळ प्राधिकरणाकडून आर्थिक गुन्हे विभागाला देण्यात आली. मात्र पोलिस निरीक्षक संजय गोविलकर यांनी केवळ प्राथमिक चौकशीनंतर भामलाला सोडून दिलं होतं. त्यानंतर भामला देश सोडून पळाल्याची माहिती पोलिसांनी मिळाली.
मुंबईत बनावट नोटा चलनात आणल्याप्रकरणी भामला याला 2004 मध्ये पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र अंतरिम जामीन मिळवल्यानंतर पसार झालेला भामला फरार घोषित करण्यात आला होता.
जुहूमध्ये बंगला विकण्याच्या आमिषाने फसवणूक केल्याचा आरोप एका बिझनेसमनने केल्यानंतर भामलावर आणखी एक गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी भामलासाठी लूक आऊट नोटीस जारी केली होती.
संजय गोविलकर यांना अतुलनीय शौर्याबद्दल राष्ट्रपतींचे पोलिस पदक (पोलिस कर्मचाऱ्याला देण्यात येणारा सर्वोच्च शौर्य पुरस्कार) प्रदान करण्यात आलं होतं. मरिन ड्राईव्हवर कसाब आणि इस्माईल खान यांना पकडताना गोविलकर हे कॉन्स्टेबल तुकाराम ओंबळे यांच्यासोबत उभे होते. कसाबला जिवंत पकडताना ओंबळेंना आपला जीव गमवावा लागला होता. गोविलकर आणि इतर अधिकाऱ्यांनी 26 नोव्हेंबर 2008 रोजी इस्माईल खानला गोळ्या घालून कंठस्नान घातलं होतं.