मुंबई: हिवाळी अधिवेशनाची वेळ साधून आंदोलन करण्याच्या तयारीत असलेल्या मराठा आंदोलकांना (Maratha Agitation) रोखण्यासाठी मुंबई आणि लगतच्या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुंबईत येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात आहे. तर राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्ते आणि नेत्यांना नोटीसा धाडण्यात आल्या आहेत. हिवाळी अधिवेशनात विरोधकांकडून हा मुद्दा लावून धरला जात आहे. राज्य सरकारची ही कृती म्हणजे आणीबाणी असल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांकडून केला जात आहे. (Maratha agitation in Maharashtra)
मीरा-भाईंदर, वसई-विरार आयुक्तालयाकडून शेकडो मराठा कार्यकर्त्यांना 149 ची नोटीस पाठवण्यात आली आहे. स्थानिक पोलीस ठाण्यांनीही अशाप्रकारच्या नोटीस बजावल्या आहेत.
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाला समर्थन देण्यासाठी मुंबईत जाऊ नये. कुठेही कायदा सुव्यवस्था निर्माण होणार नाही, रस्ता रोको, निदर्शन करू नये, अशा सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत. आंदोलन केल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही पोलिसांनी संबंधित मराठा कार्यकर्त्यांना बजावले आहे.
7 ते 21 डिसेंबरच्या कालावधीत आयुक्तालय हद्दीत महाराष्ट्र अधिनियम 1951 च्या कलम 37 (1)(3) प्रमाणे मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. मराठा कार्यकर्ता घराबाहेर पडू नये यासाठी पोलिसांकडून मराठा कार्यकर्त्यांवर करडी नजर ठेवण्यात आली आहे.
कार्यकर्ते कुठे राहतात, कोणत्या कार्यालयात जातात, त्यांच्या गाडीचा क्रमांक याचीही पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. पोलिसांच्या येणाऱ्या वारंवार फोनमुळे मराठा कार्यकर्ता मानसिक दबावाखाली आल्याचा आरोप पालघर जिल्हा समन्वयक विश्वास सावंत यांनी केला.
मराठा आंदोलकांना रोखण्यासाठी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. महामार्ग वाहतूक पोलीस, जिल्हा मुख्यालय अतिरिक्त पोलीस दल , खोपोली व खलापूर पोलीस, जिल्हा वाहतूक पोलीस खालापूर टोल नाक्यावर उपस्थित आहेत.
पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त लावल्याने मराठा आंदोलकांकडून गनिमी काव्याचा वापर केला जाऊ शकतो. आंदोलक नेहमीप्रमाणे गाड्यांवर झेंडे आणि बॅनर लावणार नाहीत. त्यामुळे आंदोलकांच्या गाड्यांची ओळख पटवणे अवघड आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पोलिसांनी आतापर्यंत चार संशयित वाहने ताब्यात घेतली आहेत.
संबंधित बातम्या: