मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांच्या भाषणावर कारवाई होणार की नाही याबाबत राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ (rajnish sheth) यांनी मोठं विधान केलं आहे. राज ठाकरे यांच्या भाषणावर आजच कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती रजनशी शेठ यांनी दिली आहे. औरंगाबादचे पोलीस आयुक्त याबाबतचा अभ्यास करत आहेत. त्यामुळे आजच राज यांच्या भाषणावर कारवाई होईल, असं रजनीश शेठ यांनी सांगितलं आहे. तसेच राज ठाकरेंना नोटीस दिली की नाही मला माहीत नाही. तो विषय पोलीस आयुक्तांकडे आहे, असंही त्यांनी सांगितलं. आज राज्याचे गृहनिर्माण मंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला. आम्ही संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात केला आहे. अनेकांची धरपकड केली आहे. तर सुमारे 13 हजार लोकांना नोटिसा बजावल्या आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही पोलिसांची जबाबदारी आहे. कुणीही कायदा हातात घेऊ नये. राज्यात अनुचित प्रकार घडवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही रजनीश शेठ यांनी दिला आहे.
रजनीश शेठ यांनी पत्रकार परिषद घेऊन हा इशारा दिला. राज ठाकरे यांच्या भाषणाचा अभ्यास केला आहे. त्यावर कारवाई करण्यासाठी औरंगाबाद सीपी सक्षम आहे आणि ते करतील. या प्रकरणी कोणते गुन्हे दाखल करायचे त्याचा अभ्यास सीपी करत आहेत. कोणीही जातीय तेढ निर्माण केली तर आम्ही त्यावर कडक कारवाई करू. आम्ही मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. अनेकांना नोटीसा दिल्या आहेत. 87 एसआरपीएफ कंपनी, 30 हजारावर होमगार्ड तैनात करण्यात येणार आहेत. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू न देण्याच्या सूचना सर्व पोलीस आयुक्तांना देण्यात आल्या आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
गृहमंत्र्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलीस सक्षम आहेत. समाजकंटक आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. सामाजिक एकोपा ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवर अनेक बैठका घेतल्या आहेत. एसआरपीएफ आणि होमगार्ड राज्यात तैनात करण्यात आले आहेत. कायदा व सुव्यवस्था बिघडवल्यास कारवाई करू. राज्यातील जनतेला आवाहन आहे की त्यांनी शांतता व सुव्यवस्था राखावी. पोलिसांना सहकार्य करावं, असं रजनीश शेठ यांनी सांगितलं. राज्यातील कायदा व सुव्यवस्था हाताळण्यात महाराष्ट्र पोलीस सक्षम असल्याचंही त्यांनी सांगितलं.
राज्यात 15 हजार लोकांवर कारवाई केली आहे. हे सर्व समाजकंटक आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत. तसेच 13 हजार लोकांना 149ची नोटीस देण्यात आली आहे. याशिवाय पोलिसांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.