अमरावती : स्वाभिमानी पक्षाचे आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि प्रहारचे बच्चू कडू (Bachu Kadu) यांच्यातील वाद काही शमन्याची चिन्हे दिसत नाहीत. या वादात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी हस्तक्षेप केल्यामुळं हा वाद काहीसा कमी झाल्याचे दिसत होतं. पण, या वादात आता शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे ठाकरे यांनी उडी घेतली. आदित्य ठाकरे म्हणाले, दोन्ही आमदार हे खोक्यावरून भांडतात. आदित्य ठाकरे हे बच्चू कडू आणि रवी राणा यांना म्हणाले. यावर रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिला. रवी राणा म्हणाले, माझा कोणाशी वाद नाही. मी सिद्धांताची लढाई लढतो. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मातोश्रीवर बसून मुंबई महानगरपालिकेत “खोक्याचं” राजकारण सुरू केलं.
किशोरी पेडणेकर महापौर असताना त्यांनी किती खोके मातोश्रीवर पोहोचवले हे संपूर्ण जनतेला माहिती आहे. खोक्याशिवाय उद्धव ठाकरे यांचा पत्ता हलत नव्हता. खोक्याची प्रथा ही आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी सुरू केली आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर बच्चू कडू यांच्याबाबात रवी राणा म्हणाले, कोण काय अल्टिमेटम देते, याकडे माझं लक्ष नसते. माझ्याविरोधात कोणी आंदोलन केलं याची मी पर्वा करत नाही. जेव्हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बोलवतील तेव्हा केव्हाही जाऊ.
माझे नेते देवेंद्र फडणवीस आहेत. पण, मला विश्वास आहे, देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना न्याय दिला. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यात पैसे जमा झालेत. अमरावती जिल्ह्यात ५५४ कोटी रुपये दिलेत. यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी चांगली केली. आम्हाला गर्व आहे की, विदर्भाचा चांगला नेता राज्याच्या राजकारणात आहे.
फडणवीस यांच्यामुळं राज्याला न्याय मिळतो आहे. फडणवीस माझ्या सोबत आहेत. त्यामुळं कुणी कितीही आंदोलन केलं तरी मला काही फरक पडत नाही. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून मी अमरावती जिल्ह्यात जनतेची सेवा करण्याच संकल्प केलाय.