मुंबईची तुंबई झालेली असतानाच मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी

| Updated on: Jul 08, 2024 | 2:51 PM

Mumbai Powai Lake Overflow : मुंबईत मुसळधार पाऊस कोसळतोय. अशाचत मुंबईकरांसाठी आनंदाच बातमी आहे. पवई तलाव भरुन वाहू लागला आहे. त्यामुळे मुंबईकरासाठी ही दिलासादायक बातमी आहे. औद्योगिक क्षेत्रातील पाणीप्रश्न यामुळे मिटणार आहे. याबाबतचे महत्वाचे अपडेट्स... वाचा सविस्तर...

मुंबईची तुंबई झालेली असतानाच मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी
मुंबईतील पवई तलाव ओव्हरफ्लो...
Image Credit source: tv9
Follow us on

कालपासून मुंबईत दमदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचलंय. यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. बाहेर धो-धो पाऊस कोसळत असताना, मुंबईची तुंबई झालेली असतानाच मुंबईकरांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्वाची बातमी… मागच्या काही दिवसात समाधानकारक पाऊस झाल्याने मुंबईतील पवई तलाव भरुन वाहू लागला आहे. 1890 साली 12. 59 लाख रुपये खर्चून हा कृत्रिम तलाव बांधण्यात आला होता. हा तलाव यंदाच्या पावसाळ्यात ओव्हर फ्लो झाला आहे. या तलावाचे पाणी पिण्यायोग्य नसल्याने प्रामुख्याने औद्योगिक बाबींसाठी वापरण्यात येतं. त्यामुळे मुंबईतील उद्योग विश्वातील पाणी प्रश्न आता मिटणार आहे.

पवई तलाव ओव्हरफ्लो…

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कृत्रिम तलावापैकी एक महत्त्वाचा तलाव असणारा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा पवई तलाव ओव्हर फ्लो झाला आहे. आज पहाटे 4:45 वाजताच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला आहे. 545 कोटी लीटर एवढी जलधारण क्षमता असणाऱ्या या तलावाचं पाणी पिण्यायोग्य नाही. त्यामुळे पवई तलावाचं पाणी हे केवळ उद्योगासाठी  वापरलं जात आहे.

पवई तलावातील पाणी प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी आणि आरे दुग्ध वसाहतीतील पिण्याव्यतिरिक्तच्या इतर कारणांसाठी वापरलं जातं. गेल्या तीन दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे. हा तलाव ओव्हरफ्लो झाल्याची माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.

पवई तलावाची काही वैशिष्ट्ये

बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून साधारणपणे सुमारे 17 मैल म्हणजेच 27 किलोमीटर अंतरावर हा तलाव आहे. या कृत्रिम तलावाचं बांधकाम 1890 मध्ये पूर्ण झालं. या तलावाच्या बांधकामासाठी सुमारे 12.59 लाख रुपये एवढा खर्च तेव्हा आला होता. पवई तलावाचं पाणलोट क्षेत्र हे सुमारे 6.61 किलोमीटर आहे. तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे 2.23 चौरस किलोमीटर एवढे असतं.
तलाव पूर्ण भरलेला असेल तर या तलावामध्ये 545.5 कोटी लीटर पाणी असतं. हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचं पाणी मिठी नदीला जाऊन मिळतं.